‘शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घरी बसून शेतीबाडी पाहावी’, भाजपच्या मंत्र्यांची जोरदार टीका

Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar & Supriya Sule: शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घरी बसून शेतीबाडी पाहावी, अशा खोचक शब्दात भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. तसेच, ते एकटेच काम करत आहे, असे म्हणाल्या होत्या. यावर बोलताना आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
राज्यात सरकार स्थापन होऊन खातेवाटप देखील झाले आहे. मात्र, अद्याप काही मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा कारभार स्विकारलेला नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. तसेच, राज्यातील सरकारमध्ये मंत्री नावालाच असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सरकार चालवतात, असे त्या म्हणाल्या होत्या. यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे.
जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे, जनाधार नसलेल्यांनी आता घरी बसावं. शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसून शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
आणखी तशा प्रकारची वांगी त्यांनी पिकवावी. वांग्यात किती पैसे आहेत, बटाट्यात किती पैसे आहेत, याचे त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करावे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोलीत करत असलेल्या कामावरून कौतुक केले होते. तसेच, अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारलेला नसून, केवळ फडणवीस एकटेच काम करत असल्याच्या त्या म्हणाल्या होत्या.





