Rabindranath Tagore : चीनमधील भारतीय दूतावासाच्या आवारात रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

बीजिंग : चीनमधील भारतीय दूतावासाच्या आवारात नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धपुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध चिनी शिल्पकार युआन झिकुन यांनी हा पुतळा घडवला आहे. शनिवारी दूतावासाने आयोजित केलेल्या संगमम अ कन्फ्लुअन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रेडिशन्स या परिसंवादाच्या निमित्ताने या शिल्पाचे अनावरण करण्यात आले.
शतकापूर्वी टागोरांची चीन भेट ही आपल्या संस्कृतीच्या संवादातील एक मैलाचा दगड होती, असे या पुतळ्याचे अनावरण करताना, चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप रावत म्हणाले. टागोरांचा वैश्विक मानवतावादाचा संदेश आणि झू झिमो आणि लियांग किचाओ सारख्या चिनी विद्वानांशी त्यांची मैत्री दोन्ही राष्ट्रांना प्रेरणा देत आहे, असे रावत म्हणाले.
एक प्रसिद्ध शिल्पकार युआन यांनी गांधीजींचा एक पुतळा देखील घडवला आहे. त्यामध्ये महात्मा गांधी हातात पुस्तक घेऊन एका अनोख्या बसलेल्या स्थितीत बसले असल्याचे दिसते आहे. भारतीय दूतावास दरवर्षी गांधी जयंती साजरी केली जाते. नयनरम्य चाओयांग पार्कमध्ये २००५ मध्ये हा पुतळा स्थापित करण्यात आला होता. रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या आयुष्यात तीनदा चीनला भेट दिली होती.
चीनमध्ये त्यांचे चाहते आहेत आणि त्यांच्या साहित्याचे भाषांतर करण्यासाठी अनेकांनी बंगाली आणि इंग्रजी शिकण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. २००९ मध्ये चीनच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जनमत सर्वेक्षणात, चीनच्या आधुनिक विकासाला आकार देण्यात सर्वाधिक योगदान देणाऱ्या ५० परदेशी नागरिकांच्या यादीत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह टागोर यांचा समावेश होता.





