Jamkhed News : जामखेडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; दीड वर्षाच्या बालिकेचा डावा डोळा निकामी, तिघे जखमी
Jamkhed News : जामखेड शहरातील खर्डा रोडवरील बोराटे वस्ती येथे पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या भीषण हल्ल्यात दीड वर्षाच्या निष्पाप बालिकेसह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Jamkhed News : शहरातील खर्डा रोड परिसरातील बोराटे वस्ती येथे पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दीड वर्षाच्या बालिकेसह तिघे जखमी झाले. या हल्ल्यात जागृती सौरभ बेल्हेकर (वय १.५ वर्षे) हिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून तिचा डावा डोळा निकामी झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. (Jamkhed News)
बोराटे वस्ती येथे घरासमोर खेळत असताना कुत्र्याने जागृतीवर अचानक हल्ला केला. तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. तिचे वडील सौरभ बेल्हेकर यांनी तिला तातडीने जामखेड येथील रुग्णालयात दाखल केले. (Jamkhed News)
प्राथमिक उपचारानंतर तिला नगरमार्गे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तिच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, दुखापत गंभीर असल्याने डावा डोळा निकामी झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पुढील उपचारासाठी सुमारे १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. (Jamkhed News)
याच कुत्र्याने शिवराज बोराटे (वय ४) या बालकाच्या हाताला, कानाला आणि मानेवर चावा घेतला. तसेच रस्त्याने जाणाऱ्या आनंद सानप (वय २१) या तरुणाच्या कमरेला चावा घेतल्याचे सांगण्यात आले. तिघांवर उपचार सुरू आहेत. (Jamkhed News)
घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि तरुणांनी कुत्र्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप तो हाती लागलेला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Jamkhed News)
दरम्यान, शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत नागरिकांकडून नगरपरिषदेकडे तक्रारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (Jamkhed News)
घटनेनंतर प्रशासनाने संबंधित कुत्र्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी तसेच परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Jamkhed News)
प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
बोराटे वस्तीतील घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. (Jamkhed News)
Jamkhed News: वाघा गावात करडई आद्यरेषीय प्रात्यक्षिकासाठी सुधारित बियाणे वाटप





