Jamkhed News: वाघा गावात करडई आद्यरेषीय प्रात्यक्षिकासाठी सुधारित बियाणे वाटप
Jamkhed News: हवामान बदलावर मात करण्यासाठी करडई लागवड उत्तम पर्याय

जामखेड : सध्याच्या बदलत्या हवामानात आणि पावसाच्या लहरीपणामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी करडई हे अत्यंत फायदेशीर व हमखास उत्पादन देणारे रब्बी पीक आहे.
याच पार्श्वभूमीवर काल, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी वाघा (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे ‘अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर’ यांच्या वतीने ‘करडई आद्यरेषीय प्रात्यक्षिक २०२६-२७’ अंतर्गत १५ निवडक शेतकऱ्यांना प्रत्येकी ४ किलो (प्रति एकर) सुधारित करडई बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सोलापूर संशोधन प्रकल्पाचे पैदासकार डॉ. हितेंद्रसिंह राजपूत मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत डॉ. संदीप डिघुळे, डॉ. रमेश भदाने, डॉ. प्रफुल्ल पवार आणि जितेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. हितेंद्रसिंह राजपूत म्हणाले की, “सध्या शेती आणि शेतकरी हवामान बदलाच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. अशा वेळी कमी पावसावर तग धरणारी आणि अवर्षणाचा ताण सहन करणारी पिके घेणे काळाची गरज बनली आहे.
करडई हे रब्बी हंगामातील असे एकमेव पीक आहे जे जेमतेम ओलाव्यावरही उत्तम येते आणि उशिरा पेरणीसाठीही योग्य ठरते. पावसाचा लहरीपणा व तापमानातील चढ-उतार यावर मात करण्यासाठी करडई लागवड हा कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.”
करडईच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना तज्ज्ञांनी सांगीतले की, करडईच्या तेलामध्ये ‘संतृप्त स्निग्ध आम्लाचे’ (Saturated Fatty Acids) प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे याचे तेल हृदयविकार टाळण्यासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
तसेच, करडईची सोटमुळे जमिनीत खोलवर जात असल्याने ती जमिनीच्या खोल भागातील ओलावा आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात. कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी पावसातही हे पीक हमखास उत्पन्न देऊन जाते.
बियाणे वाटपानंतर उपस्थित कृषी तज्ज्ञांनी १५ प्रात्यक्षिकधारक शेतकऱ्यांना करडईची योग्य बीजप्रक्रिया, पेरणीची वेळ, दोन ओळींमधील अंतर, संतुलित खत व्यवस्थापन आणि आंतरमशागत याबद्दल सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन केले.
या प्रात्यक्षिक उपक्रमामुळे वाघा व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये करडई लागवडीबाबत मोठा उत्साह दिसून येत असून, हवामान बदलाच्या काळात हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर पुण्यात MPSCच्या आंदोलनात येताच, विद्यार्थांकडून ‘गो बॅक’चा नारा





