Rabi Lamichhane : नेपाळचे माजी गृहमंत्री राबी लामिछाने यांची कोठडी वाढवली

Rabi Lamichhane – नेपाळमधील न्यायालयाने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष राबी लामिछाने यांच्या कोठडीमध्ये १५ दिवसांची वाढ केली आहे. सहकारी गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगच्या आरोपांचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे. लामिछाने यांच्याशिवाय माजी पोलीस महानिरीक्षक छाबिलाल जोशी, लीला पछाई आणि राम राम बहादुर खनाल यांच्याही कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
लामिछाने यांना १८ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात एकापेक्षा जास्त प्रकरणांचा तपास सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकरणात ते गेल्या ४० दिवसांपासून कोठडीमध्ये आहेत. लामिछाने हे पूर्वी वृत्तवाहिनीचे पत्रकार होते. गोरखा मिडीया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी ३० दशलक्ष रुपयांचा सहकारी निधी स्वतःच्या खात्यामध्ये वळवला असल्याचा आरोप आहे.
लामिछाने यांच्यावरील आरोपांचा तपास करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी संसदीय समिती नियुक्त करण्यात आली होती. लामिछाने हे आर्थिक गैरव्यवहारामध्ये गुंतले असल्याचा निष्कर्ष या समितीने काढल्यावर त्यांच्याविरोधात क्रिमिनल इन्हेस्टिगेशन ब्युरोने तपास सुरू केला होता. मात्र, लामिछाने यांच्या कायदेशीर पथकाने त्यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगून कोठडीच्या मुदतवाढीला विरोध केला होता.





