रब्बीच्या पेरणीच्या ४० टक्क्यांची घट

यंदा कोकणच्या धर्तीवर उन्हाळी भातलागवडीचा कुसगाव बुद्रुकमध्ये प्रयोग
मावळ तालुक्यातील स्थिती : पावसाचा “मुक्काम’ वाढल्याने शेतकऱ्यांची पाठ
पिंपरी – परतीचा पाऊस लांबल्याने यंदा मावळ तालुक्यातील रब्बीच्या हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बीचे पेरणी क्षेत्र 40 टक्क्यांनी घटली असल्याची बाब कृषी विभागाच्या अहवालानुसार समोर आली आहे. यंदा रब्बीक्षेत्र (उसासह) सरासरी 5 हजार 950 हेक्टर क्षेत्र आहे, मात्र प्रत्यक्षात तालुक्यातील सात महसूल मंडलमधून एकूण क्षेत्रावर 3 हजार 768.45 पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे रब्बीचे सुमारे 40 टक्के क्षेत्रावर अद्यापही पेर झालेली नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
मावळ तालुक्यात लोणावळा, खडकाळा, शिवणे, तळेगाव दाभाडे, कार्ला, काले कॉलनी, वडगाव असे सात महसूल मंडल आहेत. या मंडलांतर्गत तालुक्यात सरासरी क्षेत्र 5 हजार 950 आहे, त्यापैकी 3 हजार 768.45 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदाचे विशेष म्हणजे मावळ तालुक्यात पहिल्यांदाच उन्हाळी भातपिकाची लागवड झाली आहे. याशिवाय एकूण रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्रात वाढ झाली आहे. सरासरी 3450 हेक्टर असताना ती 3 हजार 693 हेक्टर क्षेत्रांपर्यंत वाढलेली दिसते. याशिवाय ज्वारीचे तालुक्यात 1400 सरासरी क्षेत्र असताना आतापर्यंत केवळ 957 हेक्टरवर पेरणी झाली. तसेच एकूण रब्बी तृणधान्याचे 2401 हेक्टर क्षेत्रापैकी 1804.45 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी करणे पसंद केले असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.
मावळात 1 लाख 14 हजार 314 हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यामध्ये 68 हजार 680 हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य असून, 32 हजार 736 हेक्टर क्षेत्र हे जंगलाखालील आहे. कुरणे, चराऊ असे 5 हजार 553 हेक्टर दिसते. पड आणि ओसाड (मशागतीस) हे 7 हजार 194 हेक्टरचा समावेश होतो. तालुक्यात 15 हजार 500 हेक्टर क्षेत्र खरिप पेरणी क्षेत्र आहे. रब्बी पेरणी क्षेत्रामध्ये सरासरी 4 हजार 768 हेक्टर आहे. विशेष म्हणजे उन्हाळी पेरणी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असून, ते 915 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.
खरीप अन् रब्बीही “थंड’
पवन मावळ, नाणे मावळ आणि आंदर मावळ या प्रमुख तीन विभागात भातपिकाची लागवड ही टप्प्याटप्प्याने होत असते. सुरवातीला लागवड झालेल्या क्षेत्राला यंदा परतीच्या पावसाचा फटका चांगलाच बसला. उत्पादनावर परिणाम मोठा परिणाम झाला. याशिवाय भातचा पेंडाही शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसामुळे पीक वाहून जाणे, खाचरात पाणी साचणे त्यामुळे मोठे नुकसान झाले. आता परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे त्याचा विपरित परिणाम रब्बी हंगामावरही झाला. पेरणीचा कालावधी उलटून गेल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी चाडावर हातच ठेवला नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिप पीक हातचे गेले आणि रब्बीचा पेरा नाही झाला, असे वास्तव चित्र दिसून येत आहे.
रब्बीचा पेरणी हंगाम 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर असा आहे. तरीही त्यानंतर परतीचा पाऊस कोसळत होता. त्यामुळे पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मावळ तालुक्यात रब्बी हंगाम “थंड’ दिसतो. तालुक्यात उसासह 3768 हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षीपेक्षा यंदा पेरणीत कमालीची घट झाली आहे. अद्यापही काही भागात पेरणी सुरू आहे, त्यामुळे क्षेत्रात
वाढ होईल.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.






