पुणे जिल्हा : हुडहुडी वाढली; रब्बीसाठी पोषक वातावरण

गहू पिकांत खुरपणीच्या कामात बळीराजा मग्न
चिंबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागात सध्या हुडहुडी वाढली असल्याने शेतशिवारातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसाठी ती पोषक ठरत आहे. तसेच प्रारंभी पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकांना ओंब्या लागल्यास सुरुवात होणार असल्याने शेतकर्यांनी खुरपीवर भर दिला आहे.
गव्हाचे पीक चांगलेच बहरले आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा, बुरशी रोगांचे प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली होती. यात मोठ्या प्रमाणावर औषधे, कीटकनाशके यांची फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गास आर्थिक फटका बसला.
या वर्षी गहू व हरभरा या रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. गत काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे हे पीक संकटात सापडले होते; परंतु आता वातावरण निरभ्र झाल्याने ही पिके बहरण्याच्या स्थितीत असून आता वातावरणाने दगा देऊ नये, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.
दरम्यान, गहू पिकांत खुरपणी सुरू असली तरी शेतमजुरांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकरीवर्ग स्वत: कुटुंबासह शेतात राबत आहे.





