पाटणा : भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर.के.सिंह यांनी मंगळवारी स्वपक्षाच्या आणि मित्रपक्षाच्या नेत्यांना घेरणारी आक्रमक भूमिका मांडली. त्यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यातून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएची डोकेदुखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने बिहारमधील राजकारण तापू लागले आहे. अशात जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी एनडीएच्या दोन बड्या नेत्यांवर आरोपांची सरबत्ती केली. त्यांनी उपमुख्यमंत्री असणारे भाजपचे नेते सम्राट चौधरी यांच्या डी.लिट पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इयत्ता १० वीची परीक्षा उत्तीर्ण न करता चौधरी यांना ती पदवी कशी काय मिळाली, असा सवाल त्यांनी केला. तर, मंत्री आणि जेडीयूचे नेते अशोक चौधरी यांच्यावर किशोर यांनी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला. अशोक चौधरी यांनी अवैध स्वरूपाचे २०० कोटी रूपयांचे जमीन व्यवहार केल्याचा दावा त्यांनी केला. किशोर यांच्या आरोपांमुळे एनडीएची कोंडी झाली आहे. अशात त्या आघाडीचे टेन्शन वाढवणारा पवित्रा आर.के.सिंह यांनी स्वीकारला. बिहारच्या दोन मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. ते राज्य सरकारची आणि सत्ताधारी पक्षांची प्रतिमा डागाळणारे आहेत. त्यामुळे आरोप खोटे असल्याचे पुरावे असतील तर मंत्र्यांनी पुढे यावे. प्रसंगी किशोर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करावा. अन्यथा, संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सिंह यांचा बिहारच्या आरा मतदारसंघात पराभव झाला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा खासदार बनण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. आपल्या पराभवाला स्वपक्षीयच जबाबदार असल्याची भावना बनल्याने ते अस्वस्थ, नाराज आहेत. स्वत:च्या पराभवाचा विषयही सिंह यांनी आज पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. अमरेंद्र प्रताप सिंह आणि राघवेंद्र प्रताप सिंह या भाजपच्याच आमदारांनी लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले. त्याविषयीची माहिती मी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना दिली. त्या आमदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्यास मी त्यांच्या विरोधात प्रचार करेन, असा इशारा त्यांनी दिला.