R Ashwin : अभिषेक-बुमराह अन् सॅमसनचा नंबर मागणाऱ्या नकली झाम्पाची अश्विनने अशी घेतली फिरकी, पाहा VIDEO

R Ashwin Busts Fake Adam Zampa’s Scam Attempt : भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मजेदार आणि खळबळजनक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने नकली अॅडम झाम्पा बनून भारतीय खेळाडूंचा संपर्क क्रमांक मागणाऱ्या व्यक्तीचं पितळ उघड पाडलं. अश्विनने हा व्हिडिओ त्याच्या एक्स अकाउंटवर “नकली अॅडम झाम्पाने स्ट्राइक करण्याचा प्रयत्न केला” या मथळ्यासह पोस्ट केला. हा व्हिडीओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी अश्विनच्या तिखट आणि विनोदी उत्तरांना पसंती दर्शवली आहे.
या घटनेत, एका अज्ञात व्यक्तीने ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झाम्पा असल्याचे भासवत अश्विनला व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला आणि त्याच्याकडून अभिषेक शर्मा, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे या भारतीय खेळाडूंचा संपर्क क्रमांक मागितला. अश्विनने मिश्किलपणे या व्यक्तीला खेळवताना सांगितले की, तो संपर्क क्रमांकांची यादी पाठवेल आणि विचारले की ही नावे पुरेशी आहेत का? यानंतर अश्विनने पलटवार करत नकली झम्पाला विचारले, “तुझ्याकडे एमएस धोनीचा नंबर आहे का?”
अश्विनने घेतली नकली झाम्पाची फिरकी –
😂😂😂🤣🤣🤣 pic.twitter.com/vPPSeqrvbz
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) October 19, 2025
नकली झाम्पाने “होय, माझ्याकडे आहे” असे उत्तर देताच अश्विनने त्याला धोनीचा नंबर मागितला. या प्रश्नाने नकली झाम्पाचे पितळ उघड पडलं आणि संभाषण एका मजेदार वळणावर संपले. नकली झाम्पाने पुन्हा संपर्क क्रमांकांसाठी दबाव टाकला असता, अश्विनने विनोदात सांगितले की, तो एक एक्सेल शीट तयार करून पाठवत आहे.हे पहिल्यांदाच घडलेले नाही की अश्विनसोबत कोणी ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा – IND W vs ENG W : सलग तीन पराभवानंतर भारताच्या वाढल्या अडचणी! सेमीफायनल गाठता येणार का? जाणून घ्या समीकरण
अगोदरही घडला होता असा किस्सा –
यापूर्वी अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले होते की, एका व्यक्तीने चेन्नई सुपर किंग्जचा माजी सहकारी डेव्हॉन कॉनवे असल्याचे भासवत त्याच्याशी संपर्क साधला होता. अश्विनने सांगितले, “आयपीएल संपल्यानंतर एका व्यक्तीने मला डेव्हॉन कॉनवे असल्याचे सांगून मेसेज केला, ‘हाय मित्रा, कसा आहेस?’ मी उत्तर दिले, ‘आपण संपर्कात राहू. तू एमएलसी खेळतो आहेस, मी सामना पाहीन.’ त्यानंतर त्याने विचारले, ‘मी विराट कोहलीचा नंबर गमावला आहे, तू शेअर करू शकतोस का?’ मला शंका आली की तो विराटचा नंबर का मागतोय? मला त्याला विचारायचे होते, पण डेव्हॉन कॉनवेला गैरसमज होऊ नये म्हणून मी विराट कोहलीचा कार्ड उचलला आणि त्याला चुकीचा नंबर दिला.”
हेही वाचा – IND vs AUS : ना धावा झाल्या, ना नेतृत्त्वाची छाप! गिलच्या नावावर झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
अश्विनच्या या तिखट आणि विनोदी शैलीने चाहते खूश झाले असून, त्याच्या सतर्कतेचे आणि बुद्धिमत्तेचे कौतुक होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.





