Raj Thackeray : प्रश्न, इशारा, टोला अन्…..; राज ठाकरेंच्या भाषणातील ४ आक्रमक मुद्दे जाणून घ्या…

Raj Thackeray : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याने संपन्न झाला. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही मराठी भाषेला केंद्रस्थानी ठेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती.
व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आल्यानंतर दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. यानंतर सभागृह घोषणांनी दणाणून गेले. सर्वप्रथम राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करून मायमराठीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर दाखवून देऊ असा थेट इशारा दिला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीत मुद्दे मांडले. त्यातील ४ महत्वाचे मुद्दे पाहूयात….
१ प्रश्नच अनाठायी होता, कुठून अचानक हिंदीचं आलं कळलं नाही. हिंदी कशासाठी हिंदी? कोणासाठी असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला. लहान मुलांवर जबरदस्ती करतायत तुम्ही. कुणाला विचारायचं नाही, तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमची सत्ता, बहुमत आहे आम्ही लादणार… तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात… आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे.
२ हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास, हिंदी भाषा नसलेली राज्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम, हिंदीवाले इकडे येतायत. आणि हे म्हणतायत हिंदी शिका, कोणासाठी शिकायचं. भाषेबद्दल वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही असो श्रेष्ठच असते. एक भाषा उभा करायला खूप परिश्रम लागतात. लिपी उभी करायला प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा उभा राहत नसतात.
३ इंग्रजांनी सव्वाशे वर्षे राज्य केलं. मराठा साम्राज्य अटकेपर्यंत गेलं, आम्ही मराठी लादली? असा सवाल राज ठाकरेंनी केला. हिंदी दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे. कशासाठी आणि काय करायचंय नेमकं, यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का, यासाठी भाषेला डिवचू, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू, असा आरोप राज ठाकरेंनी सरकारवर केला. कोणाची माय व्याली त्यांनी पुढे यावं, महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
४ आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. माघार घेतली ना, मग वेगळ्या ठिकाणी प्रकरण वळवायचा प्रयत्न सुरू केला. काय तर म्हणे ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकले. ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. दादा भुसे मराठीमध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले ना? फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. असा खोचक टोला त्यांनी लगावला. कुठे काय शिकले याचा काय संबंध? असे देखील राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : “आम्हा दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, आता…” उद्धव ठाकरेंचा फडणविसांवर हल्लाबोल





