सरकारी बँकांचे तिमाही निकाल उत्साहवर्धक; इंडियन ओव्हरसीज, इंडियन बँक आणि साउथ इंडियन बँकेच्या नफ्यात वाढ

मुंबई – भारतीय बँकांची स्थिती बळकट होत असून सरकारी बँकांनी नफादायक ताळेबंद जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परवा महाराष्ट्र बँकेने नफादायक ताळेबंद जाहीर केला होता. गुरुवारी इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक या बँकांनी चांगले ताळेबंद जाहीर केले.
इंडियन ओव्हरसीज बँकेने जाहीर केलेल्या ताळेबंदा नुसार या बँकेचा नफा दुसर्या तिमाहित 58 टक्क्यांनी वाढून 1,226 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या बँकेला केवळ 777 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. या तिमाहीत बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 5,856 कोटी रुपये इतके झाले आहे.
गेल्या वर्षी या तिमाहीत ही रक्कम 5,055 कोटी रुपये इतकी होती. बँकेने सांगितले की, बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता या तिमाहीत कमी होऊन 1.83% इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या बँकेची अनुत्पादक मालमत्ता 2.72% इतकी होती. बँकेच्या शेअरचा भाव गुरुवारी 0.60 टक्क्यांनी कमी होऊन 39.99 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता.
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने जाहीर केलेल्या ताळेबंदा नुसार दुसर्या तिमाहीत या बँकेचा नफा 11.53 टक्क्यांनी वाढवून 3,018 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या बँकेला 2,706 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेने सांगितले की, बँकेची अनुत्पादक मालमत्ता कमी झाली आहे.
त्यामुळे या तिमाहीत बँकेला खराब कर्जापोटी केवळ 739 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 1,099 कोटी रुपये होती. त्यामुळे या तिमाहीत बँकेचा नफा वाढण्यास मदत झाली आहे. बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता या तिमाहीत 2.6% नोंदले गेली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 3.48% होते. गुरुवारी या बँकेच्या शेअरचा भाव 2.27 टक्क्यांनी वाढून 792 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता.
दरम्यान खासगी क्षेत्रातील साउथ इंडियन बँकेचा दुसर्या तिमाहीत नफा आठ टक्क्यांनी वाढून 351 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेला 325 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्या बँकेचे दुसर्या तिमाहीतील व्याजाचे उत्पन्न वाढून 1,875 कोटी रुपये इतके झाले आहे. या तिमाहीत बँकेला खराब कर्जापोटी केवळ 63 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी बँकेला यासाठी 110 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती.




