मीमांसा : नेपाळमध्ये पुन्हा ‘प्रचंड’ राज

नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांत राजकीय सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला होता. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे तेथील राजकीय स्थिती अस्थिर बनते की काय अशी भीती वाटत होती. अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ पुष्प कमल दहल प्रचंड ( Pushpa Kamal Dahal ‘Prachanda’) यांनी घेतली आहे.
राजकीय अस्थिरतेचा सामना करत असलेल्या नेपाळच्या पंतप्रधानपदी पुष्प कमल दहल प्रचंड यांची राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी नियुक्ती केली. प्रचंड म्हणून प्रसिद्ध असलेले पुष्प कमल दहल, एके काळी एक माओवादी गुरिल्ला होते. त्यांनी आपल्या देशाला लोकशाही प्रजासत्ताक बनवण्यासाठी हिंदू राजेशाहीविरुद्ध रक्तरंजित दशकभर बंडखोरी केली, ते आता नेपाळचे नवे पंतप्रधान आहेत. प्रचंड चीनसमर्थक आहेत.
गेल्या काही वर्षांपासून नेपाळमधील सत्ताधारी चीनसमर्थक बनले आहेत. चीनकडून देशाला मिळणारी आर्थिक मदत कशी नेपाळमध्ये खेचून आणता येईल, याकडे तेथील सत्ताधाऱ्यांचे लक्ष असते. प्रचंड हे काही नेपाळमध्ये नवी क्रांती करतील, असे नाही. अन्य पक्षांसोबत केलेल्या आघाडीनुसार सुरुवातीची अडीच वर्षे प्रचंड पंतप्रधान राहतील. यानंतर सीपीएन-यूएमएलकडे पुढील अडीच वर्षे सत्तेच्या चाव्या येतील. अर्थात माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे हे दोन्ही नेते चीन समर्थक आहेत. फक्त सत्ताबदल झाला या पलीकडे नेपाळचे राजकारण पुढे जात नाही. ते “जैसे थे’ आहे.
नाट्यमय घडामोडीत विरोधी पक्ष सीपीएन-यूएमएल व अन्य 5 लहान पक्षांनी प्रचंड यांच्या सीपीएन-माओवादी सेंटर (सीपीएन-एमसी)ला पाठिंबा जाहीर केला. त्यानुसार प्रचंड यांनी राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. राज्यघटनेच्या कलम 76(2)नुसार राष्ट्रपतींनी आघाडी सरकार बनवण्यासाठी राजकीय पक्षांना रविवारपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, नेपाळ कॉंग्रेस पक्षाचे तेव्हाचे पंतप्रधान शेरबहादूर देउबा यांच्यासोबत सत्तेचे समीकरण न जुळल्यामुळे प्रचंड यांनी ऐनवेळी ओली यांच्यासोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. सुरुवातीची अडीच वर्षे पंतप्रधानपद आपल्याला मिळावे, या मुद्द्यावरून देउबा आणि प्रचंड यांच्यात बिनसल्यानंतर नवीन समीकरणाची जुळवाजुळव सुरू झाली होती. त्यानुसार दिवसभरात झालेल्या नाट्यमय घडामोडीत ओली यांच्या सीपीएन-यूएमएल आणि अन्य पक्षांच्या 165 खासदारांनी प्रचंड यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे प्रतिनिधी सभेत सर्वाधिक 89 जागांसह सर्वांत मोठा पक्ष असलेल्या देउबा यांच्या नेपाळी कॉंग्रेस पक्षाला आता सत्तेबाहेर बसावे लागणार आहे.
सभागृहात सीपीएन-यूएमएलकडे 78 आणि सीपीएन-एमसीकडे 32 जागा आहेत. 275 सदस्यीय प्रतिनिधी सभेत नवीन आघाडीला 165 सदस्यांचे समर्थन मिळाले आहे. यात सीपीएन-यूएमएल आणि सीपीएन-एमसीशिवाय आरएसपीच्या 20,आरपीपीच्या 14, जेएसपीच्या 12, जनमतच्या सहा आणि नागरिक उन्मुक्ती पक्षाच्या तीन सदस्यांचा समावेश आहे. नेपाळचे 33वे पंतप्रधान म्हणून पुष्प कमल दहल यांची निवड झाली आहे. त्यांनी यापूर्वी 2008-2009 आणि पुन्हा 2016-2017 या काळात पंतप्रधानपद भूषवले होते. नेपाळमध्ये जेव्हा गृहकलह सुरू होता, त्यानंतरची शांतता प्रक्रिया आणि राजेशाही संपुष्टात आल्यानंतर पहिल्या नेपाळी संविधान सभेदरम्यान दहल हे नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी) नेते होते.
2008 च्या निवडणुकीत, सीपीएन(एम) हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि दहल त्याच वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान झाले. प्रचंड यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात पोखरा, कास्की येथे घनश्याम दहल या नावाने झाला. मॅट्रिकच्या परीक्षेदरम्यान त्यांनी आपले नाव बदलून पुष्प कमल दहल असे ठेवले. प्रचंड यांचे बालपण चितवनमध्ये गेले. त्यांनी रामपूर, चितवन येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रीकल्चर अँड ऍनिमल सायन्समधून कृषी विज्ञान डिप्लोमा प्राप्त केला आणि जाजरकोट येथील ग्रामीण विकास प्रकल्पात काम केले. तरुणपणात त्यांनी गरिबी पाहिली आणि ते डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांकडे आकर्षित झाले. 1981 मध्ये ते नेपाळच्या भूमिगत कम्युनिस्ट पक्षात (चौथे अधिवेशन) सामील झाले. ते 1989 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मशाल) चे सरचिटणीस बनले. हा पक्ष पुढे नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) बनला. 1990 मध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेनंतरही प्रचंड भूमिगत होते. तेव्हा ते कुणाला फारसे ज्ञात नव्हते, त्यांनी पक्षाच्या गुप्त शाखांवर नियंत्रण ठेवले, तर बाबुराम भट्टराई यांनी संसदेत युनायटेड पीपल्स फ्रंटचे प्रतिनिधित्व केले.
1990 मध्ये नेपाळने बहुपक्षीय लोकशाही स्वीकारल्यानंतर 24 वे आणि 2008 मध्ये राजेशाही संपुष्टात आणल्यानंतर आठवे पंतप्रधान बनले. त्यांनी 24 मे 2017 रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि जूनमध्ये नेपाळी कॉंग्रेसचे शेर बहादूर देउबा त्यांच्यानंतर आले. 25 डिसेंबर 2022 रोजी पुष्प कमल दहल प्रचंड यांची नेपाळमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. नेपाळमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय अस्थिरता आली आहे. दर दोन-तीन वर्षांनी पंतप्रधान बदलतात. तसेच नेपाळची अर्थव्यवस्था चीनवर अवलंबून आहे. नेपाळी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील पाच पक्षांच्या सत्ताधारी आघाडीपासून दूर गेल्यानंतर आणि पंतप्रधानपदासाठी दावा मांडल्यानंतर किंचित धक्का देत 68 वर्षीय प्रचंड पंतप्रधान बनले आहेत.
देऊबा आणि प्रचंड यांनी सुरुवातीला क्रमाने नवीन सरकारचे नेतृत्व करण्यास सहमत झाले होते. परंतु असे म्हटले जाते की, प्रचंड यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान नेपाळी कॉंग्रेसने राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोन्ही प्रमुख पदासाठी दावा केला होता, तो प्रचंड यांनी फेटाळला. त्यानंतर चर्चा निष्फळ ठरली.





