Pusegav ST Bus : वडूज आगाराचा मनमानी कारभार! पुसेगाव-डिस्कळ परिसरातील एसटी फेऱ्या बंद; ग्रामस्थांचा इशारा
Pusegav ST Bus : वडूज आगार प्रशासनाच्या पक्षपाती धोरणामुळे शिंदेवाडी, गारवडी आणि कातळगेवाडी या महत्त्वाच्या मुक्कामी एसटी फेऱ्या गेल्या काही काळापासून पूर्णपणे बंद.

Pusegav ST Bus – पुसेगाव-डिस्कळ परिसरातील शिंदेवाडी (मुक्काम), गारवडी (मुक्काम), आणि कातळगेवाडी (मुक्काम) या महत्त्वाच्या एसटी फेर्या वडूज आगार प्रशासनाच्या पक्षपाती आणि दुजाभावाच्या धोरणामुळे गेल्या काही काळापासून पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे या भागातील शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि विशेषतः महिला वर्गाला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
वडूज आगाराच्या या आडमुठ्या कारभारामुळे पुसेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडूज आगाराच्या अख्त्यारित येणार्या इतर सर्व गावांमधील एसटी फेर्या सुरळीत सुरू आहेत. मात्र, पुसेगाव पंचक्रोशीतील लोकांचीच जाणूनबुजून गैरसोय केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या तडवळे गावाला दिवसातून तब्बल तीन-तीन वेळा एसटीची सेवा दिली जात आहे. तर मग पुसेगाव पंचक्रोशीत जवळपास 30 ते 40 गावे येत असूनही येथील हजारो प्रवाशांना एसटी सेवेपासून वंचित का ठेवले जात आहे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
महिला आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
एसटी फेर्या बंद असल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वडाप वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून धावणार्या या वाहनांमुळे रोज अपघाताची टांगती तलवार असते. महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे शासन एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजना राबवते, तर दुसरीकडे वडूज आगाराचे अधिकारी महिलांना खाजगी वाहनांमधून जीवघेणा प्रवास करायला भाग पाडत असून ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे बोलले जात आहे.
वडूज आगारावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा
पुसेगाव व डिस्कळ पंचक्रोशीतील जनतेला गृहीत धरण्याचे काम वडूज आगार प्रशासनाने थांबवावे. शिंदेवाडी, गारवडी आणि कातळगेवाडी या हक्काच्या मुक्कामी फेर्या तात्काळ पूर्ववत सुरू न झाल्यास, संपूर्ण पुसेगाव परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी वडूज आगारावर धडक मोर्चा काढतील आणि तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा पंचक्रोशीतील संतप्त प्रवाशांनी दिला आहे.





