Pusegaon News : पुसेगावकरांच्या ‘या’ चुकीमुळे ८८ लाखांचा निधी परत जाणार? नितीन देशमुखांचा इशारा
Pusegaon News : दुसऱ्या गावातून आणलेला प्रकल्प रखडला! जागेअभावी आणि नागरिकांच्या गैरसमजांमुळे पुसेगावचा ८८ लाखांचा घनकचरा प्रकल्प टांगणीला.

Pusegaon News – कचऱ्याच्या समस्येतून पुसेगाव शहराची कायमस्वरूपी सुटका करू शकणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणपूरक ‘घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प’ केवळ जागेअभावी आणि काही ग्रामस्थांच्या गैरसमजांमुळे रखडला आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून तब्बल ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मात्र, योग्य जागा न मिळाल्यास हा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली असून गावाचे नुकसान होत असल्याची खंत पुसेगाव येथील युवा नेते नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे. पुसेगाव (ता. खटाव) येथील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चारी बाजूला पडणाऱ्या कचऱ्यामुळे अस्वच्छता पसरत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
वास्तविक पाहता हा प्रकल्प दुसऱ्या गावातून वर्ग करून पुसेगावला आणण्यात आला आहे. आपल्यासोबतच्या इतर गावांमध्ये हे प्रकल्प उभे राहून सुरूही झाले आहेत, मात्र पुसेगावमध्ये जागेच्या उपलब्धतेअभावी आणि विरोधामुळे हा प्रकल्प अंतिम टप्प्यात येऊन थांबला आहे. या प्रकल्पामुळे कचरा पेटवला जाईल, प्रदूषण होईल किंवा विहिरींचे पाणी खराब होईल, असा गैरसमज काही ग्रामस्थांमध्ये पसरला आहे.
परंतु, हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे. हा अत्यंत आधुनिक आणि सुंदर प्रकल्प आहे. ८८ लाखांचा निधी मंजूर होऊनही जर पुसेगावकरांनी जागा देण्यास सहकार्य केले नाही, तर हा निधी शासनाकडे परत जाईल. निधी माघारी गेल्यास पुसेगावची कचरा समस्या कधीच सुटणार नाही आणि गावाला पुन्हा ‘जैसे थे’ अस्वच्छतेच्या परिस्थितीत राहावे लागेल.
याला सर्वस्वी आपणच जबाबदार असू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हा प्रकल्प झाल्यास पुसेगाव येथील कचरा कायमचा नाहीसा होईल व गाव सुंदर आणि स्वच्छ बनेल. त्यामुळे वैयक्तिक मतभेद आणि गैरसमज बाजूला ठेवून, पुसेगावमधील सर्व नागरिकांनी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतीला जागा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरात लवकर सहकार्य करावे, असे आवाहन नितीन देशमुख यांनी केले आहे.





