प्रभात वृत्तसेवा पुणे – शालेय वाहनांमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका घेत, सर्व शालेय वाहनांमध्ये ३१ जुलैपर्यंत सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला शालेय वाहतूक करणार्या वाहनचालकांनी केराची टोपली दाखवली. आजही अनेक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबस किंवा व्हॅनमध्ये सीसीटीव्ही नाहीत. तर ज्यामध्ये सीसीटीव्ही आहेत, त्यातील निम्मे बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरटीओकडून धडक कारवाई करीत सीसीटीव्ही नसणाऱ्या स्कूल बसची फिटनेस तपासणीच केली जाणार नसल्याने अशा वाहनांवर कारवाई होणार आहे. पुणे शहरात जवळपास ७ हजार १०३ स्कूल बस व व्हॅनची संख्या आहे. त्यातील बोटावर मोजता येईल एवढ्याच स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यातही काही बसमधील सीसीटीव्ही बंदच असतात. तर व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बसविल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे मागील वर्षभरात स्कूल व्हॅनसह बसमध्ये शालेय विद्यार्थी, लहान मुलांबरोबर घडलेल्या प्रकरणातून पुणे पोलिस आणि परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने सर्व स्कूल बस आणि व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्याचे आदेश दिले. त्यासाठी जवळपास एक महिन्याची (दि. ३१ जुलैपर्यंत) मुदत दिली. तरीही बहुतांश शालेय वाहनांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. त्यावरून वाहनचालकांची उदसीनता दिसून येते. मात्र, आता ज्या शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही नाही अशा शालेय वाहनांची फिटनेस तपासणी पुणे आरटीओकडून थांबविण्यात आली आहे. तसेच, सीसीटीव्ही नसलेल्या आणि फिटनेस नसलेल्या शालेय वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. “शालेय वाहतूक करणारी वाहने फिटनेससाठी आरटीओत आल्यावर वाहनामध्ये सीसीटीव्ही असेल (कार्यान्वित) तरच फिटनेस केले जात आहे. तसेच आरटीओच्या वायुवेग पथकाकडूनही विशेष मोहीम राबवून सर्व वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरासह फिटनेस आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. दोषी वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाईल.” – स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे सूचना – स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही बसवावेत – सहा ६ वर्षांखालील मुलांसाठी महिला कर्मचारीची नियुक्ती – मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक – ड्रायव्हर, कंडक्टर, क्लीनर यांची पोलीस चारित्र्य पडताळणी करावी – क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी वाहतूक होत असलेल्या रिक्षांवर कारवाई