Khojewadi Sub Station : सव्वासहा कोटींचा निधी गेला कुठे? पहिल्याच पावसात महावितरणचे पोल कोलमडले
Khojewadi Sub Station : खोजेवाडी उपकेंद्रांतर्गत नवीन वीजवाहिन्यांच्या कामाबाबत गंभीर प्रश्न; अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसात खांब उखडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट.

Khojewadi Sub Station – खोजेवाडी, ता. सातारा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज उपकेंद्रांतर्गत नवीन वीजवाहिन्यांच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. खोजेवाडीसह सात ते आठ गावांच्या परिसरात नुकत्याच टाकण्यात आलेल्या वीजवाहिन्यांचे खांब पहिल्याच पावसात कोलमडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि महावितरण कंपनीच्या अधिकार्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या उपकेंद्रासाठी तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी आधी सव्वातीन कोटी व वाढीव तीन कोटी, असा एकूण सव्वासहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली. खोजेवाडी आणि गावांच्या वीज पुरवठ्याची पाहणी करून, गावठाण व शेतीपंप फीडरची वेगवेगळी उभारणी करण्यात आली. मात्र, ठेकेदाराने केलेल्या चुकांमुळे स्थानिक नागरिकांसमोर समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.
नवीन वीजवाहिन्यांसाठी उभारण्यात आलेले काही खांब यावर्षीच्या पडलेल्या अवकाळी व मान्सूनपूर्व पावसात वाकले किंवा उखडून पडले. पावसाचा जोरदार मारा सहन न करू शकणारी ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबर नागरिक आणि जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी कामाची तपासणी न करता, ठेकेदाराला मोकळे रान दिल्याचा आरोप होत आहे.
काम सुरू असताना गुणवत्ता नियंत्रण करण्यात आले होते का? तांत्रिक निकषांचे पालन झाले का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी. वारंवार कोलमडत असलेले खांब तातडीने बदलून, दर्जेदार काम करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जनतेच्या पैशातून करण्यात येणार्या कामांवर अधिक काटेकोर देखरेख करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
वीजवाहिन्यांची उभारणी करताना, खांबांना तळापासून काँक्रिट वापरले नाही. फक्त दिखाव्यासाठी जमिनीच्या पातळीला खांबांच्या तळात काँक्रिटीकरण केल्याने, हे खांब सहज पडत आहेत. वाहिन्या उभारताना अनेक झाडांचे शेंडे तोडले होते. त्यांना फुटवा आल्याने अनेक ठिकाणी तारा त्यात गडप झाल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठ्यात वारंवार अडचणी येत आहेत. उपकेंद्रासह वीज वाहिन्यांचे निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराकडून ही कामे पुन्हा करून घ्यावीत आणि त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जोर धरत आहे.






