Purandar water crisis: ऐन पावसाळ्यात पुरंदर तहानलेला! धरणे कोरडीठाक, ‘या’ २४ गावांवर भीषण संकट
Purandar water crisis: जून महिना संपत आला तरी पाऊस गायब; पुरंदर तालुक्यातील २४ गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

Purandar water crisis – जून महिना संपत आला तरीही पुरंदर तालुका अद्याप तीव्र उन्हाच्या आणि दुष्काळाच्या झळा सोसत आहे. तालुक्यातील जवळपास २४ गावठाणासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर शासकीय टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ३२ शासकीय टँकरच्या माध्यमातून ८५ खेपा करून नागरिकांची तहान भागविली जात आहे. ऐन पावसाळ्यात पाऊस गायब झाल्याने नागरिकांना पुढील काळात पिण्यासाठी,
पशुधनासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आताही पाण्याची गरज भागविण्यासाठी आणखीन टँकर आणि पशूधनासाठी नव्याने चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे. गतवर्षी तालुक्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व आणि मान्सून पाऊस समाधानकारक झाला होता. ओढे-नाले ओसंडून वाहत होते. विहीर, बोअरवेल यांची पाणीपातळी वाढली होती.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसानंतर यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे वाटले होते. परंतु, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने आणि मान्सून लांबल्याने तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. अनेक गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होऊ लागली. सद्यस्थितीत तालुक्यात २४ गावठाणसह,
वाड्या-वस्त्यांवर ३२ पाण्याचे टँकर दिवसभरात ८५ खेपा सुरू आहेत. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यांपासूनच दोन टँकरच्या माध्यमातून काही भागात पाणीपुरवठा होत आहे. पुरंदर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासोबत, शेतीच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून पशूधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चारा छावणी किंवा नवीन चारा डोपो सुरू करून, दावणीचे पशुधन वाचवावे, अशी मागणी केली आहे.
धरणांमधील सध्याचा पाणीसाठा
पुरंदर तालुक्यातील नाझरे, गराडे, माहूर, घोरवडी, पिलाणवाडी, वीर नाला या धरणात सध्या मृत पाणीसाठा आहे. तर, पिंगोरी १३ टक्के अतिअल्प पाणीसाठा शिल्लक आहे. जून संपत आला तरीही मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्याने अनेक भागातील धरणे, विहीरी, ओढे- नाले, तलाव, कूपनलिका कोरडेठाक आहेत.
या गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा
पुरपोखर, भिवरी, पिसे, साकुर्डे, बहिरवाडी, वागदावाडी, भिवडी, राख, राजुरी, वाल्हे, सोनोरी, बोपगाव, शिवरी, कोडीत बुद्रूक, दौंडज, झेंडेवाडी, गराडे, टेकवडी, धनकवडी, मांढर, काळदरी, चांबळी, थापेवाडी-वारवडी, तक्रारवाडी या गावठाणसह वाड्या-वस्त्यांवर दररोज ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे पुरंदर पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता वैभव ढोक यांनी सांगितले.





