प्रभात वृत्तसेवा वाघापूर – पुरंदर तालुक्यातील दिवे – गराडे जिल्हा परिषद गट व गराडे आणि दिवे पंचायत समिती गणामधील लढती या चुरशीच्या आणि रोमहर्षक होतील, असे सध्याचे चित्र आहे. निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप यांच्यातच मुख्य चुरस होणार असल्याने दुरंगी लढत निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांकडून ही निवडणुकीत रंगत येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात महायुती एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर त्या त्या पक्षाचे नेते अस्तित्व व वर्चस्वासाठी प्रयत्न करणार असल्याने महायुतीत अंतर्गत वर्चस्वासाठी संघर्ष शक्य आहे. सर्व पक्षाचे नेते गावोगावी दौरे करून पंचायत समिती, जिल्हा परिषद घेण्याच्या प्रयत्नात आहेत. राजकीय मेळावे, गावभेट दौरे, विविध उपक्रम सातत्याने राबवीत आहेत. स्थानिक नेते आणि कार्यकर्ते एकत्र राहून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. गराडे गट व पंचायत समितीचे गराडे आणि दिवे गणावर अनेक वर्षे माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांचे वर्चस्व होते. परंतु मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपमधील वर्चस्व, मतभेद व अंतर्गत कुरघोडीचा फायदा आमदार विजय शिवतारे यांना झाला आहे. गराडे गटातून शिवसेनेच्या ज्योती राजाराम झेंडे विजयी झाल्या. तर गराडे गणात दत्तात्रय शंकर काळे आणि दिवे गणात रमेश एकनाथ जाधव हे शिवसेनेतून विजय झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता. आता भाजपच्या दृष्टीने ही लढत प्रतिष्ठेची आणि राजकीय अस्तित्वाची मानली जात आहे.गराडे गटात सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने दिग्गजांची संधी हुकली आहे. गराडे गटाचा विचार करता या गटावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. या निवडणुकीत आमदार विजय शिवतारे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संभाजी झेंडे, भाजपचे बाबा जाधवराव, गंगाराम जगदाळे, भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांच्यातील कलगीतुरा कसा रंगतोय, याकडे पुरंदरच्या जनतेचे लक्ष लागले आहे. एकमेंकाचे घटक पक्ष पुन्हा आमने- सामने.. दिवे गण हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव झाल्याने गणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे विधानसभेला एकत्र आलेल्या महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. ज्या गावात उमेदवारी असेल त्याठिकाणी बहुतांश गाव एक होऊन त्यांना मतदान करीत असते. मग त्याठिकाणी तो कोणत्या पक्षाचा आहे, हे पहिले जात नाही, असा या गणाचा इतिहास आहे. या गणात आजी-माजी ओबीसी पदाधिकाऱ्यांनी आता मतदारांच्या थेट गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. उमेदवारी अद्याप निश्चित झाली नसताना, मतदारांना आपलेसे करण्यासाठी विविध युक्त्या कार्यकर्त्यांमार्फत सुरू झाल्या आहेत.