Purandar News: ‘टॉवर हवाच कशाला?’ पुरंदरमध्ये शेतकरी आक्रमक; ‘टॉवर हटाव संघर्ष समिती’ची स्थापना
Purandar News: विशेष ग्रामसभांचे आयोजन करून प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर करणार; टॉवरचे काम तातडीने बंद न झाल्यास पालखी मार्ग रोखण्याचा इशारा.

Purandar News – पुरंदरच्या दक्षिण भागातून ७५० केव्ही तसेच ४०० केव्ही हायटेन्शन टॉवरची लाइन जात असून पुरंदर तालुक्यातील चाळीस गावे व वाड्यावस्त्या बाधित होणार आहेत. भविष्यातील धोके लक्षात घेऊन परिंचे (ता.पुरंदर) येथे राजकीय पक्ष विरहित टॉवर हटाव संघर्ष समिती स्थापन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत परिसरातील बाधित गावातील ग्रामस्थांना मोठ्या संख्येने हजेरी लावून पुरंदर टॉवर हटाव संघर्ष समिती स्थापन करून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ न देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी भोंगवली (ता.भोर) येथील प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते. मांढर, धनकवडी, माहूर,परिंचे, सटलवाडी, नवलेवाडी, हरणी,वाल्हे,
आडाचीवाडी येथील सरपंच व प्रमुख नेते बैठकीतसाठी उपस्थित होते. स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची जनजागृती करून प्रकल्पाला विरोध असल्याचे ठराव मंजूर करायचे असल्याचे ठरविण्यात आले आहे. समितीचे सदस्य पुरंदरमधील आजी, माजी आमदार, खासदार, तसेच लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन प्रकल्पाला विरोध असल्याची भूमिका मांडणार आहेत.
जैवविविधता नष्ट होणार
दुसऱ्या टप्प्यात पुन्हा बैठक घेऊन ज्या ठिकाणी टॉवर उभे करण्याचे काम सुरू आहे. अशा कामांना विरोध करुन तातडीने काम बंद करण्याची मागणी करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यांना विश्वासात घेऊन भविष्यात होणारे नुकसान सांगण्यात येणार असून परिसराचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता नष्ट होणार आहे.
भोंगवली येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात पालखी महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला असून तालुक्यातील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा ठराव बैठकीत एकमताने घेण्यात आला. यावेळी हेमंतकुमार माहूरकर,समीर जाधव,शरद जगताप, पुष्कराज जाधव, मयूर मुळीक, निलेश जाधव,सागर करवंदे, सचिन शिंदे, शिल्पा शिर्के, पुष्पलता नाईकनवरे किसन वाघोले आदी मान्यवर उपस्थित होते.






