प्रभात वृत्तसेवा पुणे – पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या १ हजार २८५ हेक्टर जमिनीपैकी १ हजार २५४ हेक्टरची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली आहे. प्रस्तावित विमानतळालगत १४८ हेक्टर अतिरिक्त जमीन देण्यास शेतकरी तयार आहेत. त्याची मोजणी येत्या आठवड्यात पूर्ण होऊन मोजणीचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी १ हजार २८५ हेक्टर म्हणजे तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. संपादनापूर्वी जमीन मोजणीला २६ सप्टेंबरपासून प्रशासनाने सुरुवात केली. गेल्या महिनाभरात उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण या पाच गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. खानवडी आणि पारगावमधील ३१ हेक्टरची मोजणी झालेली नाही. या शेतकऱ्यांशी चर्चा करून जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरम्यान, संपादनाव्यतिरिक्त विमानतळालगतची जमीन देण्यासही शेतकरी पुढे आले आहेत. या अतिरिक्त १४८ हेक्टर जमिनीची संमती शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे. त्याची मोजणी आठवडाभरात पूर्ण झाल्यानंतर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाच्या मंजुरीनंतर उच्चाधिकारी समितीकडून भूसंपादनाच्या मोबदल्याचा दर निश्चित होईल. दर निश्चितीनंतर शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यानुसार करारनामा करण्यात येणार आहे. त्यानंतर निवाडे जाहीर करून मोबदला वाटपाचे काम सुरू होईल.