Purandar Airport: महिनाअखेरपर्यंत ८० टक्के जमिनीचा ताबा
Purandar Airport:

जिल्हाधिकारी डुडी; पुरंदर विमानतळासाठी ८५० हेक्टरचे भूसंपादन
– आतापर्यंत ३,६०० कोटी रुपये मोबदल्याचे वाटप
Purandar Airport: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे ७५ टक्के जमिनीचा प्रत्यक्ष ताबा जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. या साडेआठशे हेक्टर भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ६०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत ८० टक्के जमिनीचा ताबा प्रशासनाकडे येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांमधील १ हजार २१६ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ९६ टक्के शेतकऱ्यांनी संपादनाला संमती दिली आहे.
त्यातील एकूण क्षेत्राच्या साडेआठशे हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. या संपादनापोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ६०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती डुडी यांनी दिली.
भूसंपादनासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातील ५ हजार २०० कोटी रुपये प्रत्यक्ष विमानतळाच्या भूसंपादनास लागणार आहेत, तर सुमारे ८०० कोटी रुपये १० टक्के परतावा देताना विकसित भूखंडाच्या संपादनासाठी लागणार आहेत. सप्टेंबरअखेरपर्यंत सुमारे ८० टक्के क्षेत्र ताब्यात येईल, असे डुडी यांनी या वेळी स्पष्ट केले.





