Punjab Election 2022: आपकडून पंजाबात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेकांना तिकिटे

मुख्यमंत्री चन्नी यांचा हल्लाबोल
चंदीगड – आम आदमी पक्षाने पंजाबात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना उमेदवारी दिली असून स्वच्छ राजकारणाचा त्यांचा दावा पूर्ण बोगस आहे, असा जोरदार घणाघात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी केला आहे. आम आदमी पक्षाने पक्षांतरालाही फूस दिली असून त्यांनी अन्य पक्षातून आलेल्या 44 उमेदवारांना पंजाबात उमेदवारी दिली आहे, असा दावाही त्यांनी केला. आम आदमी पक्षाच्या प्रत्येक तिसऱ्या आणि चौथ्या उमेदवारावर सध्या फौजदारी स्वरूपाचे खटले चालू आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर राजकीय पक्षांनी ज्या उमेदवारांना नाकारले आहे त्यांना घेऊन केजरीवाल पंजाबात लढाई करीत आहेत आणि हे लोक राज्यात राजकीय बदल घडवून आणणार आहेत अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली. आपची ही लढाईही पूर्णपणे खोटेपणावर आधारित आहे. इतका खोटेपणा करूनही आपण येथे जिंकणार नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी माझ्या विरोधात खोटा प्रचार सुरू केला आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री चन्नी हे पंजाबातील दोन्ही मतदारसंघात पराभूत होतील असा दावा केजरीवालांनी केला होता, तो दावा त्यांनी फेटाळून लावला. दोन्ही मतदारसंघांमध्ये आपण किमान 25 हजारांच्या फरकाने विजयी होऊ. हा फरक 50 हजारांच्यावरही जाऊ शकतो असे चन्नी म्हणाले. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हेच धुरी मतदारसंघात अडचणीत आहेत त्यांनाच विजय मिळणे कठीण आहे, असा दावाही चन्नी यांनी केला.




