‘अमृतपाल’ जिंकला तर आम्हाला ‘पंजाब’ सोडावे लागेल; ‘भाजप’च्या उमेदवाराने व्यक्त केली चिंता

चंडीगड – भारतीय जनता पार्टीचे पंजाबच्या लुधियाना मतदार संघातील उमेदवार रवनीत सिंग बिट्टू यांनी तुरूंगातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला खलिस्तावादी उमेदवार अमृतपाल सिंग याच्यावर राजकीय हल्ला केला आहे. अमृतपाल जर निवडणूक जिंकला तर ज्या लोकांना शांतता प्रिय आहे त्या लोकांना तो पंजाबमध्ये राहु देणार नाही असे बिट्टू यांनी म्हटले आहे.
अमृतपाल सिंग आसामच्या दिब्रुगढ येथील तुरूंगात आहे. तो खडुर साहिब या मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरला आहे. २३ एप्रिल २०२३ रोजी त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायदयाखाली अटक करण्यात आली आहे. वारिस पंजाब दे या संघटनेचा तो प्रमुख असून ही संघटना स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारी संघटना आहे.
रवनीत सिंग बिट्टू हे कॉंग्रेस पक्षाकडून तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. आताच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्षाकडून ते लुधियानातून निवडणूक लढवत आहेत. आपल्या प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की पंजाबच्या लोकांना निर्णय घ्यावा लागणार आहे.
पंजाबमध्ये शांतता आणण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या बेअंत सिंग यांच्या कुटुंबाचे समर्थन करायचे आहे की अमृतपालचे समर्थन करायचे याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. ज्यांना पंजाब तोडायचा आहे ते अमृतपालच्या विजयासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत. मात्र हे लक्षात ठेवा की तो जिंकला तर आपल्याला पंजाब सोडावा लागेल.
तो खासदार झाला तर काय स्थिती होईल याचा तुम्ही स्वत:च अंदाज करा. ही निवडणूक एक निर्णय आहे जो शांतताप्रीय पंजाबींना घ्यायचा आहे. पंजाबमध्ये राहायचे असेल तर मोदी यांना मत द्या, राहायचे नसेल तर अमृतपालसारख्या लोकांना मत द्या. शांतता आणि बंधुभाव ज्यांना हवा आहे त्या लोकांना तो पंजाबमध्ये राहु देणार नाही एवढे मात्र लक्षात ठेवा.
मुळात अमृतपाल याचा उमेदवारी अर्ज स्विकारलाच कसा गेला असा प्रश्नही रवनीत सिंग बिट्टू यांनी उपस्थित केला. तो पाकिस्तानच्या सीमलगतच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतो आहे हेही लक्षात घ्यावे याकडे त्यांनी लक्ष वेधले.मोठ्या कष्टाने आपण पंजाबमध्ये शांतता आणली आहे. त्यामुळे पुन्हा वातावरण बिघडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल असे बिट्टू म्हणाले.





