पुणे | वाहतूक कोंडीने पुण्याची “तुंबई’

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात बुधवारी मुसळधार पावसाने बाणेर आणि शिवाजीनगर हे रस्ते तब्बल दोन ते तीन तास वाहतूक कोंडीमुळे जाम झाले होते. कार्यालयातून घरी जाणारे नागरिक भर पावसात अडकून पडले होते.
याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. अनेक नागरिकांनी कोंडीचे फोटो शेअर करत पुणे शहराची अवस्था मुंबई शहरासारखीच झाल्याची टीका केली. पावसामुळे मुख्य रस्ते पाण्यातच गेले होते.
खडकी रेंजहिल्स परिसरात रेल्वेपुलाखालील मार्ग पोलिसांनी बंद केला. त्यामुळे येथील वाहने वळवून भोसले नगरमार्गे पुन्हा शिवाजीनगर रस्त्यावर येत होती.
याचा फटका बसून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोचे काम सुरू आहे, त्यामुळे येथे आधीच वाहतूक संथ असते.
पावसामुळे अनेकांनी चारचाकी वाहने बाहेर काढली होती. कोंडीतून बाहेर पडताना या वाहनचालकांची दमछाक झाली. बाणेर रस्त्यावर आयसर संस्थेपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. तर, शिवाजीनगर मार्गावर शिमला ऑफिसपर्यंत वाहने थांबली होती.
पोलिसांनी पुणे विद्यापीठ चौक आणि त्या आलिकडेच वाहने थांबवून ठेवली. कारण, रेंजहिल्स भागातून शिवाजीनगरच्या रस्त्यावर वाहने परत येत असल्याने वाहतूक पुढेच जात नव्हती.
पीएमपीच्या दोन बस ब्रेकडाउन अन्…
वाकडेवाडी येथील पुलाखाली दोन पीएमपी बस ऐनवेळी बंद पडल्या. त्यांच्या आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे बसच्या मागे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या.
या रांगा अगदी काही किलोमीटरपर्यंत गेल्या होत्या. यामुळे पीएमपी प्रशासनाला त्यांची क्रेन आणि सर्व्हिस व्हॅन बंद पीएमपी पर्यंत नेता येत नव्हती. पोलिसांनी तब्बल दोन तास पावसात प्रयत्न केल्यावर पीएमपीच्या बसपर्यंत सर्व्हिस व्हॅन पोहचू शकली. त्यांनी कसे बसे दोन्ही बंद पीएमपी बसला रस्त्याच्या कडेला घेतले.
नागरिक संतप्त
– पुणे स्टेशन येथून बोपोडीला जाण्यााठी मी साडेसात वाजता निघालो होतो, मला पोहचायला सुमारे दहा वाजले. – महादेव केशव.
– अठरा किलोमीटर अंतर जाण्यासाठी मला तब्बल सव्वाचार तास सलग प्रवास करावा लागला. – तुषार कुटे
– मगरपट्टा येथून सायंकाळी सव्वाआठ वाजता निघालो होतो. पण, वाहतूक कोंडीमुळे बाणेरला पोहचायला साडेदहा वाजले. –
वाकडेवाडी येथे एकाच वेळी दोन पीएमपी बस भर पावसात बंद पडल्या. यातच परिसरात सर्वत्र पाणी तुंबले होते. यामुळे बसच्या मागे लांबवर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. बस बाजूला घेण्यास दीड ते दोन तास लागले. – अमोल झेंडे, उपायुक्त, वाहतूक शाखा





