जयपूरच्या नाहरगड जैविक उद्यानात पुण्याची भक्ती वाघीण

जयपूर – जयपूरमधील नाहरगड जैविक उद्यानात आता टायगर सफारी सुरू होणार आहे. या टायगर सफारीतील पहिली पाहुणी पुण्याची भक्ती वाघीण ठरणार आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील भक्तीला घेऊन राजस्थान वन विभागाचे वरिष्ठ वन्यजीव चिकित्सक डॉ. अरविंद माथुर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक पुण्याहून मंगळवारी रवाना झाले आहे.
प्राणी अदलाबदल कार्यक्रमा अंतर्गत वाघीणीच्या बदल्यात राजीव गांधी राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला तीन कोल्हे आणि एक मादी तरस पाठविण्यात आले आहेत. जयपूरचे विभागीय वन अधिकारी जगदीश गुप्ता यांनी याबद्दल माहिती दिली.
नाहरगड जैविक उद्यानात 30 वर्ग हैक्टर जमिनीवर 4.5 कोटी रुपये खर्चून टायगर सफारी बांधण्यात येत आहे. या सफारीत आठ किलोमीटर लांबीचा ट्रॅक बनविण्यात येत आहे. यावर पर्यटक ४५ मिनिट वाघ पाहू शकतील.
या टायगर सफारीसाठी नागपूरहूनही वाघ- वाघीणीचे जोडी आणण्यात येणार आहे. मात्र, नागपूरच्या प्राणी संग्रहालयाची स्वीकृती मिळाल्यावर ही जोडी आणण्यासाठी लगेच पथक रवाना होईल.
२१ दिवस ठेवणार क्वारंटाइन
भक्ती उद्यानात पोहोचल्यावर तिला २१ दिवस क्वारंटाइन ठेवले जाईल. क्वारंटाइन पिरियड संपला की तिला वाघांच्या पिंजऱ्यात ठेवण्यात येणार आहे. मात्र, टायगर सफारीची प्रमुख आकर्षण असल्यामुळे तिला दर्शनी पिंजऱ्यापासून दूर ठेवण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ वन्यजीव चिकित्सक डॉ. अरविन्द माथुर यांनी दिली.





