Miglia Italia Cycling Event 2024 : जिगरबाज सायकलपटू आशिष जोशींचा अटकेपार झेंडा…

Miglia Italia Cycling Event 2024 :- पुण्यातील जिगरबाज व अतिशय चिकाटीचे सायकलपटू म्हणून ओळख असलेल्या आशिष जोशी यांनी नुकतीच सोळाशे किलोमीटर अंतराची ‘1001 मिग्लिया इटालिया सायकलिंग शर्यत पूर्ण करीत अटकेपार झेंडा रोवला. पुण्यातील एकमेव आशिष जोशी यांच्यासह भारतातील सुमारे 12 सायकलपटू या शर्यतीत सहभागी झाले होते.
लांबलचक व कठीण चढाई, धोकादायक उतार, सायकल चालविताना होणारे अपघात आणि डोंगराळ भागात नेटवर्क कमी असल्याने योग्य रस्ते पुन्हा शोधणे (री-रूटिंग) अशा अनेक आव्हानांसह अवघड भूप्रदेशातून मार्गक्रमण करत आशिष जोशी यांनी हे अंतर 142 तासांत पूर्ण केले.
नियोजित वेळ हा 134 तासांचा होता आणि या वेळेत 6 जणांनी हे अंतर पूर्ण केले, तर 3 जणांनी त्यानंतर हे अंतर पूर्ण केले. त्यातील आशिष जोशी हे एक होते. खूप शारीरिक श्रम आवश्यक असलेल्या 1001 मिग्लिया इटालिया या सायकलिंग उपक्रमाची संकल्पना फर्मो रिगामोंटी यांची आहे. एका दशकात सहा आवृत्त्या झाल्या आहेत, ज्यात पाच खंडांहून अधिक आंतरराष्ट्रीय सायकलस्वार मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावर्षी 16 ते 22 ऑगस्ट 2024 दरम्यान सुमारे 700 सायकलस्वार सहभागी झाले होते.
ही स्पर्धा सर्वात जास्त लोकप्रिय व अवघड सायकलिंग स्पर्धांपैकी एक आहे. कोणत्याही बाह्य पाठिंब्याशिवाय अंतिम रेषा ओलांडणे आणि तुमची इच्छाशक्ती, सहनशक्ती आणि संयमाची परीक्षा घेणारी ही स्पर्धा असते. – आषिश ज़ोशी, सायकलपटू
संयोजकांनी आशिष जोशी यांना शर्यत पूर्ण केल्याबद्दल आणि अत्यंत सहनशीलता आणि कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल पदक प्रदान केले. याआधी, आशिष जोशी हे 2013, 2017, 2022 मध्ये लंडन-एडेनबर्ग- लंडन (1535 किमी) मध्ये सहभागी झाले होते. तसेच त्यांनी 2017 मध्ये निर्धारित वेळेत हे अंतर पूर्ण केले होते. पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस या 1235 किमी लांब अंतराच्या सायकलिंग स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता.
शर्यत पुर्ण केल्याचा आनंद अन् समाधान
आव्हानात्मक भूभाग व्यतिरिक्त, हा सुट्टीचा काळ होता, मार्गावरील गावे अक्षरशः रिकामी होती. त्यामुळे अन्न आणि पाणी मिळणे कठीण होते. याशिवाय बिघाड झाल्यास सायकल दुरुस्ती देखील सहज शक्य नव्हती. दिवसभर 36 अंशांपर्यंत वाढत असलेले तापमान आणि रात्री थंडी अधून मधून पाऊस या सर्व गोष्टींमुळे आव्हाने वाढत होती. या डोंगराळ प्रदेशात नेटवर्क कनेक्टिव्हिटी कमी योग्य मार्ग शोधणे कठीण होते. मात्र हे अंतर पूर्ण केल्यावर मला प्रचंड आनंद आणि समाधान मिळाले, असे सायकलपटू आशिष जोशी यांनी बोलताना सांगितले.





