प्रभात वृत्तसेवा पुणे – भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालताय तर त्याची माहिती १५ दिवसांच्या आत महापालिकेला द्यायची आहे. नागरिक, प्राणिप्रेमी संस्था, संघटना यांना महापालिकेने या सूचना दिल्या आहेत. तसे लेखी आदेशही महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढले आहेत. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावरून काढण्यात आला आहे. एका अर्जामध्ये याची तपशीलवार माहिती भरायची आहे. त्यामध्ये मोकाट श्वानांना ज्याठिकाणी अन्न खाऊ घालत आहे, त्या ठिकाणाची सविस्तर माहिती, अन्न खाऊ घालण्याची वेळ, किती श्वानांना अन्न खाऊ घालता त्याची अंदाजित संख्या याची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. ही माहिती १५ दिवसांच्या आत देणे आवश्यक असून, त्यानंतर महापालिका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका हद्दीमध्ये मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालण्याचे ठिकाणे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निश्चित करण्यात येतील, असेही या आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे.