Pune ZP Schools – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडक शाळांमध्ये १० वीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची गंगा अधिक प्रवाही होणार आहे. जिल्ह्यात दौंड तालुक्यातील गलांडवाडी, मुळशी तालुक्यातील भोईरवाडी, खेड तालुक्यातील निघोजे आणि खेडमधील धानोरे या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरु आहेत. त्यामुळे टप्प्याटप्याने सध्या पाचवी अथवा आठवी वर्ग असलेल्या शाळांना टप्प्याटप्प्याने नैसर्गिक वाढीस जिल्हा परिषदेकडून मान्यता दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता दहावीपर्यंत शिक्षण मिळणे शक्य होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील, विशेषतः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आता माध्यमिक शिक्षणासाठी इतरत्र भटकंती करण्याची गरज भासणार नाही. विद्यार्थ्यांची संख्या, स्थानिक गरज आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा सखोल आढावा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने या विस्ताराला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. नैसर्गिक वाढीच्या तत्त्वानुसार ५ वी ते ८ वी आणि उच्च प्राथमिक शाळांना ९ वी व १० वीचे वर्ग जोडण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषद. मुलींच्या शिक्षणाला मिळणार बळ एकाच छताखाली १० वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध झाल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः ग्रामीण भागात माध्यमिक शाळा लांब असल्यामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट सुटण्याचे (ड्रॉप-आउट) प्रमाण मोठे होते. मात्र, आता गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर होऊन त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटणार आहे. बारावीपर्यंत शिक्षण देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचा हा प्रवास केवळ १० वी पर्यंत थांबणार नसून, भविष्यात १२ वी पर्यंतची शिक्षण व्यवस्था उभी करण्याचा मानस आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेद्वारे गावोगावी सर्वेक्षण करण्यात येत असून, जिथे गरज आणि क्षमता आहे, तिथे टप्प्याटप्प्याने उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. “ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या सर्वांगीण विकासासाठी गावाजवळच सातत्यपूर्ण आणि मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. १२ वी पर्यंतची सक्षम आणि स्वयंपूर्ण शिक्षण व्यवस्था उभी करण्याच्या दिशेने हे एक ठोस पाऊल असून, यामुळे पालकांचा शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल.” – गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.