Pune ZP School : जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुणवत्ता मूल्यांकनात पुणे जिल्ह्यातील ‘या’ शाळा अव्वल; पहा पूर्ण यादी
Pune ZP School : एसक्युएएएफ (SQAAF) बाह्य मूल्यांकनात पुणे जिल्ह्याचे मोठे यश; ८१ शाळांनी पटकावली ऐतिहासिक 'ए प्लस' श्रेणी.

Pune ZP School – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (एसक्युएएएफ) निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गतच्या बाह्य मूल्यांकनात पुणे जिल्ह्यातील ८१ शाळांना ए प्लस श्रेणी प्राप्त झाली असून त्यात पुणे जिल्हा परिषदेच्या तब्बल २८ शाळांचा समावेश असून हे उल्लेखनीय यश ठरले आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. शाळांना स्वयं-मूल्यांकनासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. सन २०२४-२०२५ मध्ये राज्यातील १ लाख २ हजार ६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले.
सन २०२४-२०२५ मध्ये स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांच्या पैकी सन २०२५-२०२६ मध्ये १० हजार ७१२ शाळांची बाह्य मूल्यांकन करण्यासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी १० हजार ६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले. बाह्य मूल्यांकनानंतर त्रयस्थांद्वारे शाळांचे मुल्यांकन करण्यात आले. यात ४२९ शाळांना ए प्लस श्रेणी प्राप्त झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण ७१२ शाळांचे बाह्य मुल्यांकन पूर्ण करण्यात आले असून, त्यापैकी ८१ शाळाना ए प्लस श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. या यशात पुणे जिल्हा परिषदेच्या २८ शाळांचा ए प्लस श्रेणीत समावेश आहे. यात आंबेगाव – ४, बारामती – २, भोर – ३, हवेली – १, जुन्नर – २, खेड – ८, मावळ – २, मुळशी- १, पुरंदर- ३. शिरुर- २ याप्रमाणे तालुकानिहाय शाळांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित व स्वयं-अर्थसहाय्यित अशा सर्व प्रकारच्या शाळांचा मुल्यांकनात सहभाग होता.स्वयंमूल्यांकनानंतर ए प्लस श्रेणीस पात्र ठरलेल्या शाळाचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले. यासाठी विशेष समित्यांनी शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
शाळांची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा, पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ या निकषावर शाळांची तपासणी करण्यात आली. निकषांनुसार माहिती नोंदवून पुराव्यासह अहवाल सादर करुन शाळांना श्रेणी देण्यात आली आहे.
“भविष्यात पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांनी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील राहून अधिकाधिक शाळांनी ए प्लस श्रेणी प्राप्त करावी. पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट होत असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.”
– गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद





