Pune ZP elections | आरक्षणावरून रंगणार मोर्चेबांधणीचा खेळ

प्रभात वृत्तसेवा
सोरतापवाडी – पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागताच हवेली तालुक्यात राजकीय तापमान वाढले आहे. आरक्षणाची घोषणा व्हायच्या आतच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हवेली तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गण निश्चित झाले असून आरक्षण जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत उमेदवारांची चळवळ गावागावी सुरू झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे मंडळांना भेटी, पक्षश्रेष्ठींकडे फेर्या आणि सोशल मीडियावरील ‘आपणच उमेदवार’च्या हालचालींनी हवेली तालुका राजकीय गजबजला आहे.पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असून इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता आरक्षणाकडे लागले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या गटांची व पंचायत समितीच्या गणांची प्रारूप यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली. त्यानुसार हवेली तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गण निश्चित झाले आहेत.
लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील राजकीय नेत्यांच्या सततच्या पक्षांतरामुळे स्थानिक स्तरावरची समीकरणे गुंतागुंतीची झाली असून कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार मंडळांना भेटी देत असून त्यांच्या हस्ते आरत्या करून घेत आहेत. त्यामुळे आपणच उमेदवार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला, पुरुष व इतर आरक्षण गट-गणात नाव निघाले तरी तयारी ठेवण्याचे धोरण इच्छुकांनी स्वीकारले आहे.
सध्या तरी गावोगावी फक्त हालचाली, उपस्थिती व सोशल मीडियावर ‘आपणच उमेदवार’ असल्याचा दावा दिसत आहे. मात्र आरक्षणाचा अंतिम निर्णय आणि पक्षांचे अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतरच खरी राजकीय सरशी कोणाची हे स्पष्ट होणार आहे.
पक्षश्रेष्ठींना फेर्या, अपक्षाची तयारी..
आपल्याच सोईचे आरक्षण पडावे या अपेक्षेने इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींना गाठीभेटी देत आहेत. मात्र उमेदवारी नाकारली गेल्यास स्वबळावर अपक्ष म्हणून लढण्याची घोषणाही काही उमेदवारांकडून केली जात आहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणे, लोकसंग्रह वाढवणे, सोशल मीडियावर सक्रियता असे प्रयत्न सुरू आहेत.
तरुणांची रंगीत तालीम..
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्यात तरुणांना संधी मिळाल्याने अनेक तरुण या पदांच्या राजकारणाचे स्वप्न रंगवू लागले आहेत. लोकसंपर्क, सामाजिक कामे, सभा-मेळाव्यांत सहभाग याद्वारे तरुणाई निवडणुकीसाठी सराव करताना दिसत आहे.
हवेलीतील चर्चेतले राजकीय गणित..
हवेली तालुक्यात सध्या मोठी चर्चा सुरू आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस व मनसे एकत्र येणार का? तर दुसर्या बाजूला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) हातमिळवणी करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




