ZP Election Result 2026 : भोरमध्ये कुणाला लागणार विजयाचा गुलाल? भावनिक राजकारण चालणार की विकासाचा मुद्दा ठरणार सरस
Pune ZP Election : भोर तालुक्यातील ४ गट आणि ८ गणांसाठी आज निकाल; ७५.६२% मतदानाचा टक्का कोणाचे राजकीय भवितव्य ठरवणार?

Pune ZP Election – पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज (दि.९) जाहीर होणार असून भोर तालुक्यात सर्वत्र निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समिती आठ गणांसाठी तालुक्यात 75.62 टक्के मतदान झाले. तालुक्यात सर्वाधिक मतदान उत्रोली गटात 80:18 टक्के झाले असून भोलावडे गटात कमी 70.25 टक्के मतदान झाले आहे.
त्यामुळे मतदानाची वाढती आणि घसरती टक्केवारी कुणाला फायद्याची आणि तोट्याची ठरते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.तालुक्यातील उत्रोली गटात भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी भाजपा उमेदवार स्वरूपा थोपटे आणि पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुक्यातील नेते रणजित शिवतरे यांच्यात लढत होत असून कॉंग्रेसचे सतीश चव्हाण स्वगृही आल्यानंतर किती लढत देतात हे पहाणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
भोलावडे गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण जगदाळे आणि भाजपाचे विठ्ठल आवाळे आमने सामने आहेत. जगदाळे यांनी विजयाचा दावा केला असला तरी देखील निवडणुकीच्या आधी पंचायत समिती माजी उपसभापती राष्ट्रवादी कॉंग्रेस (श.प.गट) मानसिंग धुमाळ यांनी भाजपात प्रवेश केल्याने आवाळे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भोलावडे गटात विजयाचा गुलाल आवाळेना लागणार की जगदाळे गुलाल उधळणार हे निकालाच्या दिवशी कळेल.
तालुक्याच्या पूर्व भागातील भोंगवली गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार आणि दांडगा जनसंपर्क असलेले जिल्हा परिषद माजी सदस्य चंद्रकांत बाठे अपक्ष लढत आहेत त्यामुळे भाजपाचे नवखे उमेदवार महेश टापरे, शिवसेना ठाकरे गट महादेव सोनवणे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विक्रम खुटवड किती लढत देतात तसेच यामध्ये झालेले मतविभाजन बाठेंना फायद्याचे ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.वेळू गटात भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष यांनी बंडखोरी करत सर्वांसमोर मोठं आव्हान उभे केले आहे.
जायंट किलर कोण ठरणार ?
मागील ७ ते ८ वर्षांत जिल्हा नियोजनमधून केलेली विकास कामे भाजपाला खेडेगावात पोहचवण्यासाठी केलेले अहोरात्र कष्ट आणि ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने कोंडे यांना नागरिकांचा मिळणारा वाढता पाठिंबा बघता ते भाजपाचे पोपट सुके, राष्ट्रवादी कॉंग्रेस गणेश खुटवड, शिवसेनेचे अमोल पांगारे, शिवसेना (उबाठा)चे अनिकेत शिंदे यांना धोबी पछाड देत जायंट किलर ठरणार का हे पाहणे महत्वाचं आहे.





