ZP Election Result 2026 : आज ठरणार जिल्ह्याचे कारभारी! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतमोजणी
Pune ZP Election : जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू; निकालाचा जल्लोष करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन.

Pune ZP Election – पुणे जिल्हा परिषद ७३ गटांसाठी आणि पंचायत समिती १४६ गणांची मतमोजणी सोमवारी (दि. ९) होणार आहे. मतमोजणी ही संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. साधारणपणे एका गटाच्या मोजणीसाठी दोन तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे १२ वाजता पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. यामध्ये ७५ गटांपैकी ४४ गटांत विजय मिळवत पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. त्याखालोखाल शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ जागा मिळाल्या होत्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून ४ जागांवर यश मिळाले होते.
मात्र, यंदाची राजकीय परिस्थिती बदललेली असल्याने निकालाची गणिते वेगळी ठरण्याची शक्यता आहे.यावेळी भाजपने मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणले. माजी आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत फूट पडून दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत. तथापि, या निवडणुकीत मावळ, मुळशी आणि आंबेगाव तालुका वगळता दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येऊन लढत दिली.
तर खेड, आंबेगाव आणि जुन्नर भागांत दोन्ही शिवसेना गट आमने-सामने उभे ठाकले आहेत. याचा नेमका फायदा कोणाला होईल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.या मतमोजणीच्या कामकाजाकरिता पुरेशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.





