Pune ZP Election : सोशल मीडियाचा निवडणुकीत धुमाकूळ! हवेलीत उमेदवारांचा हायटेक प्रचार कसा चालतोय?
Pune ZP Election : घोंगडी सभा आणि पत्रके वाटप मागे पडले; व्हॉट्सअॅप स्टेटस आणि फेसबुक पोस्टच्या जोरावर हवेलीत विजयाचे गणित मांडले जात आहे.

Pune ZP Election – फेसबुक, ट्विटर (एक्स), व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सर्वच राजकीय नेत्यांना सोशल मीडियाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागले.
उद्या होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीतही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे.पूर्वी निवडणूक प्रचाराची साधने वेगळी होती. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणूक असो-उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटी, कार्यकर्त्यांमार्फत पत्रके वाटप, घोंगडी सभा, कोपरा सभा, मेळावे,
जाहीर सभा तसेच भिंतींवर नाव व चिन्ह रंगविणे अशा पारंपरिक पद्धतींचा अवलंब करत असत. मात्र गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे ही प्रचारपद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे.देशात मोबाइलधारकांची संख्या झपाट्याने वाढली असून बहुसंख्य नागरिकांकडे अँड्रॉइड फोन आहेत. मोबाइल वापरणार्या सुमारे 90 टक्के मतदारांचा फेसबुक, व्हॉट्सप, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांशी थेट संपर्क आहे.
याचाच फायदा घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे.बहुतेक गावांमध्ये तरुण पिढीकडे स्मार्टफोन असून त्यांना सोशल मीडियाचे महत्त्व चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून उमेदवारांचा सोशल मीडियावरील प्रचार अधिकच वेगाने सुरू आहे.
सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही सोशल मीडियावर प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. वयस्कर उमेदवारांपैकी अनेकांना मोबाइल वापराचा फारसा अनुभव नसल्याने काहींनी आपल्या मुलांना किंवा कार्यकर्त्यांना फेसबुक व व्हॉट्सअॅप अकाउंट चालविण्याची जबाबदारी दिली आहे. काही उमेदवारांनी बाहेरील व्यक्तींना पैसे देऊन सोशल मीडिया प्रचाराची कामे सोपवली आहेत.
मात्र या प्रक्रियेतून अनेक गमतीजमतीही घडत असून, उमेदवारांनी टाकलेले फोटो, व्हिडिओ व विविध आशयाच्या ओळींमुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.कार्यकर्ते सोशल मीडियावरून उमेदवारांचा जोरदार प्रचार करत असून व्हॉट्सप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इन्स्टाग्राम स्टोरी व व्हिडिओ हे प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरले आहे.
अनेक कार्यकर्ते घरच्यांचा फोटो बाजूला ठेवून आपल्या ‘लाडक्या’ उमेदवाराचा फोटो स्टेटसला ठेवताना दिसत आहेत. आपल्या उमेदवारास विजयी करा, प्रभागाचा सर्वांगीण विकास करू अशा आशयाचे संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत.
गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांचे विश्व अधिक व्यापक झाले असून नवनवीन प्रवाह उदयास येत आहेत. सध्या देशात सुमारे 80 कोटी नागरिक इंटरनेट वापरत असून इन्स्टाग्राम व यूट्यूबचे वापरकर्ते सर्वाधिक आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांसाठी सोशल मीडिया हे अत्यंत महत्त्वाचे प्रचारमाध्यम ठरले आहे.
मिश्र हवामानात राजकीय वातावरण तापले
गेल्या आठवड्यापासून थंडी कमी झाली असून पहाटे थंडी, सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन व रात्री गारठा असे मिश्र हवामान अनुभवास येत आहे. ग्रामीण भागात पहाटे व रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असून या शेकोटीभोवती आबालवृद्ध, लहान मुले व शेजारीपाजारी मित्रमंडळी जमू लागली आहेत. त्यामुळे गप्पांचे फड रंगू लागले आहेत.या गप्पांमध्ये कोण किती मताधिक्याने निवडून येणार,
कुठे कोण आघाडीवर आहे, कुणी किती पैसे वाटले, कोणाचा प्रचार प्रभावी ठरतो आहे अशाच विषयांवर जोरदार चर्चा होत आहे. ग्रामीण भागात शेकोटीसाठी लाकूड सहज उपलब्ध असल्याने या शेकोट्या अखंड धगधगत असतात. गुलाबी थंडी, वाढलेले ऊन आणि त्यात निवडणुकीचा ज्वर-यामुळे पूर्व हवेली परिसरात सध्या राजकीय चर्चांचे वातावरण चांगलेच तापले आहे.





