Pune ZP Election : घराणेशाहीला फाटा, कामाला महत्त्व! जयश्री पलांडेंनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; पाबळच्या पाणी प्रश्नासाठी थेट मुख्यमंत्री येणार?
राजकीय क्षेत्रात पद मिळवण्याआधीच स्वखर्चाने मोठी समाजकामे उभ्या करणाऱ्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे.

Pune ZP Election – राजकीय क्षेत्रात पद मिळवण्याआधीच स्वखर्चाने मोठी समाजकामे उभ्या करणाऱ्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. पाबळ गटातील विकास गायकवाड, दीपक खैरे आणि केंदुर गणातील आशा संपत साकोरे यांच्या विजयासाठी भाजप आपली पूर्ण ताकद पणाला लावेल. या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष सभा आयोजित केली जाईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्य जयश्री पलांडे यांनी केले आहे.
जयश्री पलांडे यांनी उमेदवारांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, हिवरे येथील विकास गायकवाड यांनी शंभरहून अधिक गरीब मुला-मुलींचे विवाह स्वखर्चाने लावले असून, कोरोना काळात हजारो कुटुंबांना आधार दिला आहे. दीपक खैरे यांनी आपल्या कौशल्याने हिवरे गावातील ५०० एकर जमीन बागायती केली असून, शेतकऱ्यांवर वीजबिलाचा भार पडू नये, यासाठी विशेष तरतूद केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले पाणंद रस्तेही त्यांनी स्वखर्चाने तयार केले आहेत.
भाजपमध्ये केवळ घराणेशाहीला महत्त्व नसून कामाची दखल घेतली जाते, याचेच उदाहरण म्हणजे ही उमेदवारी असल्याचे त्यांनी नमूद केले.केंदुर येथील आशा साकोरे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना पलांडे म्हणाल्या की, निष्ठावंत कार्यकर्ते संपत साकोरे यांनी जलजीवन मिशन योजना पुन्हा मंजूर करून आणण्यासाठी मोठा संघर्ष केला असून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली आहे.
या भागात भाजपचे व्हिजन राबवून कायापालट करण्यासाठी पक्ष कटिबद्ध असून उमेदवारांच्या पाठीशी मोठी शक्ती उभी केली जाईल. या तिन्ही उमेदवारांच्या विजयामुळे पाबळ आणि केंदुर परिसरातील प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





