Deulgaon Raje PHC : ग्रामीण भागात हायटेक आरोग्य सेवा; जिल्हा परिषद अध्यक्षांनी देऊळगावराजे केंद्राची केली पाहणी
Deulgaon Raje PHC : अद्ययावत प्रसूती कक्ष, हिरकणी कक्ष आणि प्रत्येक बेडला सेंट्रल ऑक्सिजन लाईन; ग्रामीण भागातील नागरिकांना आता मोफत आणि दर्जेदार उपचार.

Deulgaon Raje PHC – पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी रविवारी (दि.१०) देऊळगावराजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथे सुरू असलेल्या मॉडेल पीएचसीच्या कामाची पाहणी केली. जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अत्यंत अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून,
त्यामुळे नागरिकांना खाजगी दवाखान्यांचा आधार घेण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सन २०२५-२६ च्या जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून सुमारे ३४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील शाळा व दवाखान्यांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला होता. त्याच संकल्पनेतून या मॉडेल पीएचसीचे काम पूर्णत्वास आले आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत प्रसूती कक्ष, हिरकणी कक्ष, प्रत्येक बेडला सेंट्रल ऑक्सिजन लाईन, सुसज्ज ओपीडी, ऑपरेशन थिएटर तसेच जनरल वॉर्ड अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिनेश खानसुळे यांच्यासह सर्व कर्मचारी, दस्तगीर इनामदार, सचिन माने, दादा गिरमकर, किरण गिरमकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
“स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरू असलेली मॉडेल पीएचसी आणि मॉडेल जिल्हा परिषद शाळांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच ही कामे लोकांच्या सेवेत दाखल होतील.”
– वीरधवल जगदाळे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष





