मुंबई : भारतीय जनता पक्षाने मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये जोरदार बॅटिंग करताना विजय साकारले आहेत. मुंबईमध्येही भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी किंवा विजय मिळवले आहेत. त्यामुळे या विजयाच्या विश्वासानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व इतर नेत्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात जल्लोष केला. जल्लोषानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कलांनूसार महानगरपालिकेत भाजप आणि महायुतीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत जी काही वाटचाल सुरु आहे, त्यानूसार महायुतीलाच पूर्ण बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या निवडणूकीत आपण विकासाचा अजेंडा घेवून गेलो होतो, त्याच अजेंड्याला जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला आहे. लोकांना विकास हवा आहे, त्यामुळेच त्यांनी आपल्याला निवडून दिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास या विजयाने पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. या निमित्ताने मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मरण करतो, कारण त्यांचाही आशिर्वाद आपल्या पाठीशी होता, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आमचा अजेंडा हा विकासाचाच असणार आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचा विकासाचा आत्मा हा हिंदूत्वावादी आहे, त्यामुळे हिंदूत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही, असे म्हणताना त्यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. विश्वासाला तडा देवू नका यावेळी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे कौतूक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जबाबदारीची जाणीव देखील करुन दिली. ते म्हणाले की, जेवढे मोठे समर्थन मिळते, तेव्हा आपल्याला जबाबदारीचे भान देखील असणे अवश्यक आहे. लोकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्या, असा मोलाचा सल्ला देखील फडणवीसांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.