Shirur News : सीईओ गजानन पाटलांचा शिरूरमध्ये धडक दौरा; विकासकामांची झाडाझडती अन् शिक्षकांबाबत मोठा निर्णय!
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी शिरूर तालुक्याचा (Shirur News) धडक दौरा करत विविध विकासकामांची झाडाझडती घेतली.

Shirur News : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी शिरूर तालुक्याचा (Shirur News) धडक दौरा करत विविध विकासकामांची झाडाझडती घेतली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजणगाव सांडस, करंदी, मलठण, वढू बुद्रुक आणि आंबळे या गावांना भेटी दिल्या.
वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळासह ग्रामपंचायत, करंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन विभागाचा ‘बोलका दवाखाना’ आणि विविध मॉडेल स्कूल्सच्या कामांची त्यांनी बारकाईने पाहणी केली.
मलठण येथे सीएसआर व प्रशासनाच्या (Shirur News) माध्यमातून साकारलेल्या १ लाख २५ हजार झाडांच्या मियावाकी घनवनाचे त्यांनी विशेष कौतुक केले. शाळांच्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर देत, नासा-इस्रो उपक्रमांतील यशाची प्रशंसा केली आणि शाळांना सुरक्षित ठेवण्यासाठी कंपाऊंड वॉलला प्राधान्य देण्याचे सक्त आदेश दिले.
या दौऱ्यातील सर्वात मोठा आणि दिलासादायक निर्णय शिक्षक भरतीबाबत समोर आला. जिल्हा परिषदेत रिक्त असलेली सुमारे ५७० शिक्षकांची पदे महिनाभरात भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट संकेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. शिरूर तालुक्यातील दोनशेहून अधिक रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लावून धरली होती.
याशिवाय, पंचायत समितीसमोरील जलसंपदा विभागाची मोकळी जागा पार्किंगसाठी मिळवणे, पंचायत समितीच्या इमारतीवर अतिरिक्त मजला बांधणे, जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणे पंचायत समिती सदस्यांनाही स्वतंत्र विकास निधी देणे आणि शिक्रापूर येथे चासकमान प्रकल्पाच्या पाच एकर जागेत बारावीपर्यंतची शाळा सुरू करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.
ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी प्रत्येक गटात अद्ययावत व्यायामशाळा, कुस्ती मॅट, मातीचा हौद व मल्लखांब सुविधेसह ‘मिनी क्रीडा संकुल’ उभारण्याचा प्रस्तावही यावेळी पुढे आला.
दौऱ्याच्या शेवटी पंचायत समिती सभागृहात सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची मॅरेथॉन आढावा बैठक पार पडली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, वृषालीताई वाळके, सभापती स्वाती घावटे, उपसभापती पै. रामभाऊ सासवडे यांच्यासह गटविकास अधिकारी व सरपंच उपस्थित होते.
“कामे चांगली सुरू असली तरी गुणवत्ता आणि वेळेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दम देत पाटील यांनी कामांचा दर्जा राखण्याचे निर्देश (Shirur News) दिले. या दौऱ्यानंतर आता प्रत्यक्ष शिक्षक भरती आणि विकासकामांना किती गती मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






