Shirur Crime : शिरूरमध्ये 22 लाखांचे एमडी जप्त; दोन आरोपी जेरबंद
Shirur Crime : शिरूरच्या मलठण येथे पोलिसांची धडक कारवाई; ११० ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन जप्त. दोन आरोपी ताब्यात, मोटारसायकलसह २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

Shirur Crime (न्हावरे) : शिरूर तालुक्यात अंमली पदार्थांच्या बेकायदा विक्रीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. मलठण येथील राजवाडा चौक परिसरात छापा टाकून पोलिसांनी ११० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला. या पदार्थाची अंदाजे किंमत २२ लाख रुपये असून, विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटारसायकलसह एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’च्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैधरीत्या अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना पोलीस हवालदार तुषार पंधारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिष्नोई (वय ३१), दोघेही सध्या मलठण येथील मनिष शिरोळे यांच्या फॉर्म हाऊसमध्ये राहत असून, मूळ राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे दोघे एमडी विक्रीसाठी मलठण येथील राजवाडा चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या आदेशाने पंचांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांचे संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना झाले. १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १२.१० वाजता राजवाडा चौकात छापा टाकण्यात आला. यावेळी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ११० ग्रॅम एमडी आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत. अंमली पदार्थांच्या पुरवठ्यामागील साखळी आणि या प्रकरणातील पुढील धागेदोरे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग तसेच दोन्ही पथकातील पोलीस अंमलदारांनी केली.





