Gas Leakage : आंधळगावातील टोरेंट CNG कंपनीत बायोगॅस गळती; सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Gas Leakage : शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील टोरेंट CNG कंपनीत बायोगॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातून गळती झाल्याचा प्रकार समोर आला. व्हिडिओनंतर सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित.

Gas Leakage : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आंधळगाव-न्हावरे हद्दीत असलेल्या टोरेंट CNG कंपनीच्या परिसरात सोमवारी (१७ ऑगस्ट) सकाळी सुमारास बायोगॅस गळती झाल्याची घटना घडली. बायोगॅस घेऊन आलेल्या वाहनातून गॅस बाहेर पडल्याने काही काळ कंपनी परिसरात धावपळीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील विविध भागांतून बायोगॅस वाहतूक करणारी वाहने आंधळगाव येथील कंपनीत येतात. येथे बायोगॅस खाली केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी त्याची हाताळणी केली जाते. तसेच कंपनीतून CNG इतर पंपांवर वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी गॅसची हाताळणी आणि वाहतूक होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे.
सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास बायोगॅस घेऊन आलेल्या एका वाहनातून अचानक गॅस गळती सुरू झाल्याचे दिसून आले. घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओतील दृश्यांनुसार गॅस गळती सुरू असताना संबंधित कर्मचारी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करताना स्पष्टपणे दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कंपनीची यंत्रणा कितपत सक्षम आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गॅस गळतीच्या प्रसंगी गळतीचा स्रोत तातडीने बंद करणे, परिसर सुरक्षित करणे आणि आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे अपेक्षित असते. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहनाची तांत्रिक स्थिती, गॅस गळतीचे नेमके कारण आणि गॅस उतरविताना कोणत्या सुरक्षा उपाययोजना कार्यरत होत्या, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
घटनेनंतर संबंधित वाहन व गॅस गळतीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, केवळ व्हिडिओतील दृश्यांच्या आधारे घटनेबाबत अंतिम निष्कर्ष काढता येणार नसून, अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
प्रशासनाकडून सुरक्षा तपासणीची मागणी –
टोरेंट CNG कंपनीत बायोगॅसची हाताळणी आणि वाहतूक होत असल्याने संबंधित सुरक्षा विभाग, अग्निशमन विभाग आणि प्रशासनाने कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. बायोगॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी, गॅस गळती नियंत्रण यंत्रणा, अग्निसुरक्षा साधने तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे आपत्कालीन प्रशिक्षण यांचीही पाहणी करण्याची मागणी होत आहे.





