Pune : येरवडा- कात्रज बोगदा प्रकल्प अशक्य-पालिका आयुक्त

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रस्तावित केलेला येरवडा ते कात्रज हा २० कि.मी. लांबीच्या बोगदा प्रकल्पाला महापालिकेकडून मान्यता मिळणे शक्य नाही, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाच्या मार्गावर अनेक ठिकाणी प्रवेश (एंट्री) आणि बाहेर पडण्याचे (एक्झिट) मार्ग ठेवण्याची योजना होती. मात्र त्याठिकाणी अतिरिक्त लेन तयार करणे शक्य नसल्यामुळे आणि आर्थिक दृष्टिकोनातून हा प्रकल्प पालिकेसाठी परवडणारा नसल्यामुळे तो व्यवहार्य ठरत नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
पीएमआरडीएने ४,५०३ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता दिल्यानंतर कात्रज ते येरवडा बोगद्याचा प्रस्ताव तयार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगदा ‘ट्विन टनल’ स्वरूपाचा असावा आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना दिली होती.
प्रत्येक किलोमीटरसाठी अंदाजे ४०० कोटी खर्च येणार असल्याचेही समोर आले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या शहराच्या वाहतुकीसाठीच्या पुम्टाच्या बैठकीत या बोगद्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी महापालिकेने हा बोगदा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी मध्यवर्ती शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सारसबाग-शनिवार वाडा आणि शनिवार वाडा-स्वारगेट अशा दोन बोगद्यांची संकल्पना मांडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम महापालिकेकडे सोपविले आहे.
मात्र शनिवार वाडा परिसरातील हेरिटेज बंधनांमुळे आणि अंदाजे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांच्या खर्चामुळे या प्रकल्पालाही पालिकेकडून हिरवा कंदील मिळणे कठीण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्य़ात येत आहे.





