Pune : सिग्नलवर ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे : मार्केट यार्डलगतच्या गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेने बुधवारी सकाळी दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
दीपाली युवराज सोनी (वय २९) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ट्रकचालक शौकतअली पापलाल कुलकुंडी (वय ५१) याला अटक केली आहे. जगदीश आणि सहप्रवासी दीपाली हे बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास गंगाधाम चौकातील सिग्नलला थांबले होते. दुचाकीच्या मागे ट्रक होता. सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीस्वार जगदीश निघाले असता पाठीमागून ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली दुचाकी अडकल्याने चाकाखाली सापडून दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला.
बंदी झुगारून अजवड वाहने रस्त्यावर
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असली तरी ती झुगारून ट्रकचालक, डंपरचालक, टँकरचालक रस्त्यावर दिसतात. शहरात गेल्या पंधरा-वीस दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत ११ जण मृत्युमुखी पडले. यातील काही अपघात अवजड वाहनांच्या भरधाव वेगाने झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. गंगाधाम ते बिबवेवाडीतील आई माता मंदिर दरम्यान तीव्र उतार आहे. गंगाधाम चौक नेहमी गजबजलेला असतो.
मार्केट यार्डात येणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. यापूर्वी गंगाधाम ते आई मंदिर रस्त्यावरील उतारावर सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वार सून आाणि सासू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. यानंतर रहिवाशांनी आंदोलन केले होते. त्यानंतर येथे अवजड वाहनांना बंदी घातली होती. बंदी झुगारून अवजड वाहने या मार्गाचा वापर करत असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली. येथून अवजड वाहने नेण्यास रहिवाशांचा विरोध आहे.
वाहतूक कोंडी, अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या समन्वयातून वाहतूक सुधारणा करण्यात येत आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या अवजड वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.





