आता नवीन वर्षातच घोषणा होण्याची शक्यता पुणे – राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता या निवडणुकांच्या घोषणेला किमान पंधरा दिवस लागणार असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकांचे वेळापत्रक आता थेट नवीन वर्षातच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पूर्वीच्या अंदाजानुसार, जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा २४ डिसेंबरपर्यंत होईल, अशी शक्यता होती. प्रशासकीय पातळीवरील हालचाली पाहता ही घोषणा आता किमान दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात १५ जानेवारीच्या सुमारास महापालिका निवडणुका आहेत, तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे धूसर आहेत. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुकांच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांपैकी केवळ १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. येथे निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, उर्वरित २२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे त्याबाबत काय निर्णय घ्यावा, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. सध्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कमतरता आणि मतदान यंत्रांची उपलब्धता या कारणांमुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांना आता नवीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.