Maharashtra Budget Session 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग सात सात दिवस चाललेल्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रविवारी संस्थगित करण्यात आले. याबाबतची घोषणा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात करण्यात आली. आता विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईत सुरू होईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राजकीय पक्षांना आता महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे एरवी १० दिवस चालणारे हिवाळी अधिवेशन ७ दिवस चालले. हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून सुरुवात झाली. मुंबईतील कामकाज सल्लागार बैठकीत ठरल्याप्रमाणे आज रविवारी अधिवेशनाचे सूप वाजले.