Pune : नवराच पसंत नसल्याचे सांगत, पत्नीने संसार करण्यास दिला नकार अन् न्यायालयाने दिला दणका

पुणे – मनाविरोधात लग्न झाले आहे. नवराच पसंत नसल्याचे सांगत विवाहानंतर वैवाहिक संबंध न प्रस्थापित करणाऱ्या, तसेच ५ महिन्यानंतर माहेरला जात परत न येणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला आहे. विवाह रद्द करण्याचा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस.व्ही.फुलबांधे यांनी दिला आहे.
नोटीस पाठवूनही पत्नी हजर न झाल्याने न्यायालयाने एकतर्फा हा आदेश दिला. या निर्णयामुळे पतीला दिलासा मिळाला आहे. माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. १७ डिसेंबर २०२२ रोजी पारंपारिक पध्दतीने पाहणी करून दोघांचे लग्न झाले. लग्नात माधवीचा चेहरा उतरला होता.
याबाबत माधवने विचारल्यास आजारी असल्याचे तिने सांगितले. काही दिवसात सर्व सुरळीत होईल, अशी माधवला अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. पूजा झाल्यानंतर घर आवडले का, असे त्याने विचारले. त्यावेळी पतीच आवडला नाही, घरच्यांच्या सांगण्यावरून जबरदस्तीने लग्न करावे लागल्याचे तिने सांगितले.
तिने वैवाहिक संबंधास नकार दिला. ती सतत माहेरी जायची. २० अॉगस्ट २०२३ रोजी माहेरी गेली. मात्र, माधव व कुंटुबियांनी प्रयत्न करूनही ती परत आलीच नाही. त्यामुळे माधवने अॅड. राहुल जाधव यांच्यामार्फत दाखल केलेला लग्न रद्दचा अर्ज न्यायालयाने तो मंजुर केला.
“घटस्फोट घेतल्यानंतर “घटस्फोटीत’ असा शिक्का पडतो. मात्र, चुक नसतानाही जोडीदारांकडून फसवणूक झाली आहे. त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. तो मंजुर झाला. या निर्णयामुळे दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे आहेत.” – अॅड. राहुल जाधव, कार्यकारिणी सदस्य, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे.





