Pune: मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा खून; पतीला जामीन

पुणे – मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पत्नीचा गळा आवळून पतीने खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पती देवानंद मच्छिंद्र काळेल (रा. वळई, ता. माण, जि. सातारा) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली होती. त्याला जामीन मिळाला आहे. त्याने अॅड. रमेश खेमू राठोड यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
अॅड. राठोड यांना अॅड. आकांक्षा जाधव, चैतन्य पवार, प्रियांका कदम, अॅड. सुनिता खवले आणि यशस्वी चक्रनारायण यांनी सहकार्य केले. काजल काळेल यांच्या मृत्यूप्रकरणी वडील मारूती पितांबर बाड यांनी फिर्याद दिली आहे.
१८ मार्च २०२२ रोजी ही घटना घडली होती. देवानंद याला मद्याचे व्यसन आहे. जुलै २०२१ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. तो घरातील इतर कारणे आणि मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून काजल यांना मारहाण करत असे. घटनेच्या दिवशी तिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याने गुन्हा केला नाही. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. त्याने तिचा खून केलेला नाही.
आजारपणाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे अॅड. रमेश खेमू राठोड यांनी केली.





