Pune : पाण्याचे नियोजन करणार तरी कधी?

पुणे : खडकवासला प्रकल्पातून शेतीला किती पाणी सोडायचे आणि शहराला पिण्यासाठी किती पाणी राखीव ठेवायचे, याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होत असतो. आता पालकमंत्री नियुक्तीमुळे कालवा समितीची बैठक कधी होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यामुळे आता कालवा समितीची बैठकीला कधी मुहूर्त मिळणार अशी चर्चा सुरू आहे. यंदा पावसाने साथ दिल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असली, तरी पाणी वाटपाचे नियोजन रखडले आहे. शासनाने पाण्याचे प्राधान्यक्रम ठरविले आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम ठरला आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. तसेच दौंड, इंदापूर आणि बारामती या तीन तालुक्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात येते.
शहराला पिण्यासाठी आवश्यक पाणी, शेतीसाठी आवर्तने, बाष्पीभवन, काही ग्रामपंचायती आदींचा विचार करून पाण्याचे नियोजन आतापासून करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून पावसाचे आगमन उशिरा होत असल्याचे दिसून येते. जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे धरणात अपेक्षित असा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जूनमध्येही पाणी कपातीची टांगती तलवार कायम राहते.
साधारणपणे दि. 15 ऑक्टोबरला धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन पिण्यासाठी आणि शेतीसाठी नियोजन करण्यात येते. या वर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे कालवा समितीची बैठक झाली नाही. जानेवारी उलटूनही कालवा समितीची बैठक झालेली नाही.
पुण्याला वाढीव पाणी आवश्यक
पुणे महापालिकेने 23.34 टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी केली आहे. तथापि, जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मापदंडानुसार 12.82 टीएमसी पाणीवापर मंजूर केले आहे. प्रत्यक्षात पालिकेकडून सुमारे 17 टीएमसी इतके पाणी उचलले जात असल्याचा जलसंपदा विभागाचा दावा आहे. धरणातून पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असून मागील दहा वर्षांपासून यावर निर्णय झालेला नाही.
सध्या ६६ टक्के पाणीसाठा
खडकवासला, टेमघर , वरसगाव आणि पानशेत ही चार धरणे मिळून खडकवासला प्रकल्पात सद्यस्थितीत 19.35 टीएमसी म्हणजे 66.36 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पात 1.79 टीएमसी इतका जादा पाणीसाठा आहे.





