PUNE: ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’च ‘गुपित’ काय?

पुणे – ‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत कोट्यवधी रुपये निधी खर्च करून बसविण्यात आलेल्या ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’मधील माहिती गोपनीय का ठेवली जात आहे, असा सवाल ‘सजग नागरिक मंच’च्या विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये याविषयीचा अहवाल मागितला असता तो दिला जात नसल्याची तक्रारही वेलणकर यांनी केली आहे.
देभरातील वायू प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहरचाही समावेश आहे. यातून नागरीकांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. पुण्यातील हवेची गुणवत्ता वेगवेगळ्या ठिकाणी काय आहे, याचा वेध घेण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ बसवण्यात आले आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होते अशा तक्रारी आल्याने तेथून एक किलोमीटर परिसरात रहिवाशांच्या इमारतीवर पुणे स्मार्ट सिटी तर्फे दोन सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेमध्ये सोमवारी माहिती अधिकारात या सर्वच ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ द्वारा गोळा केल्या गेलेल्या माहितीचे रिपोर्ट्स पहायला मागितले असता पुणे महापालिकेकडे असे कोणतेही रिपोर्ट्स स्मार्ट सिटी काॅर्पोरेशन तर्फे पाठवले जात नसल्याचे उघड झाले. हे रिपोर्ट्स महापालिकेसह कोणालाही दाखवता येणार नाहीत, ही माहिती एका खासगी संस्थेकडे दिली जाते आणि ती हवी असेल तर या खासगी संस्थेकडे पैसे भरावे लागतात, असे उत्तर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन च्या अधिकार्यांनी दिल्याचे वेलणकर यांनी सांगितले.
अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा…
नागरीकांच्या करांतून कोट्यवधी रुपयांतून ही यंत्रणा बसवली गेलेली असताना ही माहिती गोपनीय का ठेवली जात आहे, हे कोडे उलगडत नाही. ही माहिती महापालिका, वाहतूक पोलीस, नागरीक यांना उपलब्ध झाली तर वायू प्रदूषणावर उपाययोजना करणे शक्य होईल. त्यामुळे या माहितीचा अहवाल तातडीने ‘स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन’च्या आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.





