Pune Weather: पुण्यात पुढचे दोन दिवस हवामान कसे राहणार? वेधशाळेने दिला महत्त्वाचा अंदाज
Pune Weather: गेल्या २४ तासांत पुण्यातील पावसाचा जोर ओसरला; दिवसभर उन्हामुळे रस्ते सुकले अन् शहरात अचानक धुळीचे प्रमाण वाढले.

Pune Weather – शहरात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर ओसरला असून, रविवारी (दि.९) दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे पुणेकरांना दररोजच्या रिपरिप पावसापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरात दिवसभर ऊन, ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळाला. उपनगरातील एनडीए, कोंढवे धावडे, नांदेड सिटी आणि पाषाण या परिसरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहराच्या कमाल तापमानात काहीशी वाढ झाली आहे. मात्र, रिपरिप पावसामुळे ओले असलेले रस्ते आज दिवसभराच्या उन्हाने सुकले आणि शहरात अचानक धुळीचे प्रमाण वाढल्याचे दिसत होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे पुणेकरांनी आज मुळशी, ताम्हिणी घाट, लोणावळा, एकवीरा देवी गड, महाबळेश्वर आणि नारायणपूर या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली.
मात्र, वीकेंडचा आनंद घेतल्यानंतर संध्याकाळी घरी परतताना पर्यटकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले. महामार्गांवर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, पुढील दोन दिवस पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, तर ग्रामीण भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील,
असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. एकीकडे शहरात कोरडे वातावरण असताना, दुसरीकडे पुणे जिल्ह्यात मात्र पावसाच्या हलक्या सरी सुरूच आहेत. विशेषतः घाटमाथ्यावरील भागात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. दिवसभरात कुरवंडे येथे ४ मिमी, माळिण आणि निमगिरी परिसरात ३, तळेगाव येथे २ तर एनडीए परिसरात १ मिमी पावसाची नोंद झाली.




