Talegaon Dabhade: जात प्रमाणपत्र ठरले अवैध! पुणे जिल्हाधिकाऱ्यांची तळेगावच्या नगरसेवकावर कारवाई
Talegaon Dabhade: बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र ठरवले अवैध; पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचे मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश.

Talegaon Dabhade – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक मजनू हनुमंत नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द ठरविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना दिला असून संबंधित जागा रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मजनू नाटेकर निवडून आले होते. मात्र त्यांनी सादर केलेले महार अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी, बारामती यांनी अवैध ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त होताच मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. या निर्णयामुळे तळेगाव नगर परिषदेच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून रिक्त झालेल्या जागेबाबत पुढील प्रक्रिया काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“माझ्या नगरसेवक पदाबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे.”
– मजनू नाटेकर, नगरसेवक, तळेगाव दाभाडे नगर परिषद





