Pune Weather Update : पुणेकरांनो सावधान! अवकाळीनंतर आता ‘सूर्याचा प्रकोप’; पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर
Pune Weather Update : दोन दिवसात तापमानाचा पारा पुन्हा ४० अंशांकडे; दुपारी १२ ते ३ दरम्यान उन्हाच्या झळांनी पुणेकर हैराण.

Pune Weather Update – आकाश निरभ्र आणि कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. परिणामी अवकाळी पावसामुळे ३४ अंशांपर्यंत खाली आलेल्या उष्णतेच्या पाऱ्याची पुन्हा चाळीशीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, मंगळवारी (दि. २४) लोहगाव येथे सर्वाधिक ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली.
४० अंशांवर पोहोचलेला उष्णतेचा पारा ३४ अंशांपर्यंत खाली आला. त्यामुळे पहाटे गारवा, दुपारी ऊन आणि पाऊस, असा तीनही ऋतुंचा अनुभव पुणेकरांनी घेतला. मात्र, या बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. दरम्यान, मागील दोन दिवसात शहरातील कमाल व किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, आज सकाळपासून उन्हाचा चटका वाढलेला होता. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान उन्हाच्या झळा बसत होत्या, तर उकाडाही चांगलाच वाढला होता.
लोहगाव पाठोपाठ कोरेगाव पार्क येथे ३७.८, तर शिवाजीनगर आणि पाषाण परिसरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. गेल्या २४ तासांत कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली असून, पुढील दोन ते तीन दिवस शहरातील आकाश निरभ्र राहील, तर कमाल व किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.





